– विद्यार्थांना दिले जात आहे स्क्रॅच (Scratch) या कोडिंग भाषेचे प्रशिक्षण
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि होप फाऊंडेशन ( Hope Foundation ) यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कॉम्प्युटर लिटरेसी कार्यक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयातच संगणक ज्ञान, कोडिंग कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हा आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व मनपा अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थाना हे शिक्षण दिल्या जात आहे. मनपाच्या शिक्षण अधिकारी साधना सयाम, होप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) चंद्रशेखरन पी., अर्चना सहाय – ईएसजी ग्लोबल हेड, एलटीआय माईंडट्री यांचे देखील याला सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्क्रॅच (Scratch) या कोडिंग भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कोडिंगच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः नवनवीन गेम्स, डिजिटल स्टोरीज, एनिमेशन, मंडेला आर्ट यांसारखे प्रकल्प तयार करत आहेत. विद्यार्थी इंग्रजी सूचनांद्वारे कोडिंग करतात, कंप्युटर मध्ये या कोडिंगच्या सूचना दिल्या जातात. यामुळे विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित होत आहे.

जी.एम. बनातवाला इंग्लिश माध्यमिक शाळा, गरीब नवाज उर्दू उच्च माध्यमिक शाळा व सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक/माध्यमिक शाळा या मनपाच्या तीन शाळेत सध्या याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी संगणक प्रयोगशाळेत प्रत्यक्ष सराव करत कोडिंगचे धडे घेत आहेत. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याच्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून तांत्रिक कौशल्यातही लक्षणीय प्रगती दिसून येत आहे.
यापूर्वी या उपक्रमात विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, सायबर जनजागृती, सायबर गुन्हे प्रतिबंध, इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करण्यास सजग झाले आहेत.
आगामी काळात विद्यार्थ्यांना पायथॉन (Python), ए आय (AI) आणि इतर प्रगत संगणक भाषा शिकविण्याची योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी ते अधिक सक्षम बनतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या डिजिटल उपक्रमामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता वाढली असून शिक्षण अधिक रंजक आणि परिणामकारक होत असल्याचे चित्र दिसत आहे.




