spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे या मध्यवर्ती संकल्पनेवर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा.

मुंबई 30 – स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे 19 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. ‘राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे’ ही या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती विश्वविख्यात थोर सांख्यिकी तज्ञ व भारताच्या आधुनिक सांख्यिकीचे जनक डॉ. प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा  जन्मदिन 29 जून हा दिवस सन 2007 पासून दरवर्षी संपूर्ण देशभर ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकी संस्था असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे दि. 29 जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमास अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, मुंबई  आयआयटीचे प्रा. सतिश अग्नीहोत्री, भारतीय सांख्यिकी सेवेचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपरानी, नियोजन विभागाचे सह सचिव विवेक गायकवाड, अर्थ व सांख्यिकी संचालक कृष्णा फिरके, शशिकांत मुळे तसेच नियोजन विभाग, अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी/ कर्मचारी, नियोजन क्षेत्राशी निगडित संशोधक आदी उपस्थित होते.   अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी करीत असलेले सांख्यिकीचे काम हे राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फारच उपयुक्त असल्याचे नमूद केले. देशात प्रथम महाराष्ट्रात सबस्टेट लेव्हलवर ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात येणार आहे संचालनालयामार्फत प्रकाशित होणारे विविध अहवाल केंद्र शासनाच्या टाईमलाईन बरोबर प्रकाशित करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच पुढील कालावधीत राज्य व्यवसाय नोंदवही तयार करणे व माहितीचे आदान प्रदान ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले.

सांख्यिकीय माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीचे विश्लेषण व धोरणकर्त्यांना तत्काळ आकलन होईल अशा स्वरूपाचे व्हिजुअल सादरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.  त्याचप्रमाणे माहितीच्या आधारे शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्याशी संवाद असणे आवश्यक असल्याचे मत  प्रा. अग्नीहोत्री यांनी व्यक्त केले. मागील 75 वर्षाच्या कालावधीमध्ये सांख्यिकीय कार्यालयाकडून ज्या ज्या पाहण्या घेतल्या व त्याद्वारे झालेले साध्य त्याचप्रमाणे भविष्यात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित करण्याबाबत तसेच अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे मत टोपरानी यांनी व्यक्त केले.

नियोजन विभागाचे सह सचिव  गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याची सन 2029 पर्यंत एक ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने सांख्यिकीय माहिती ही विश्वासपात्र असली पाहिजे. जेणेकरून आपण विकसित राज्य त्याचबरोबर विकसित देश ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल असे सांगितले. काळाच्या गरजेनुसार संचालनालयाच्या कामकाजात बदल करण्यात येत असून त्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याचे काम सुरु असल्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक  फिरके मनोगतात सां‍गितले. 19 व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे औचित्य साधून आज विविध विषयांवरील सांख्यिकीय माहितीची प्रकाशने व अहवाल प्रकाशित करण्यात आली. यावेळी  संचालनालयाने ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्याकरिता वस्तू व सेवांच्या किंमती ऑनलाईन नोंदविण्यासाठी भाव संकलकाकरिता मोबाईल ऍपचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत यावर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात येणाऱ्या Environment Statistics of Maharashtra 2024 या अहवालाचे प्रकाशन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी 2024-25, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक 2023-24, महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी 2022 व 2023, महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा 2021-2022 व 2022-23, शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2024, 77 वी फेरी (पत्रक) 33.1 – ‘जमीन व पशुधन धारण तसेच शेतकरी कुटुंबांची परिस्थिती’ (राज्य नमुना), 77 वी फेरी (पत्रक) 18.2 – ‘कर्ज व गुंतवणूक’  (राज्य नमुना), 78 वी फेरी (पत्रक) 5.1 – ‘बहुविध निर्देशक पाहणी’ (राज्य नमुना), 78 वी फेरी (पत्रक) 5.1 – ‘बहुविध निर्देशक पाहणी’ (केंद्र व राज्य एकत्रित नमुना), 79 वी फेरी  (पत्रक) CAMS 22-23 – ‘व्यापक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण’ (राज्य नमुना), 79 वी फेरी  (पत्रक) CAMS 22-23 – ‘व्यापक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण’ (केंद्र व राज्य एकत्रित नमुना), State Domestic Product of Maharashtra 2011-12 to 2023-24 (Base year 2011-12), District Domestic Product of Maharashtra 2011-12 to 2023-24 (Base year 2011-12), An Analysis of State Budget of Maharashtra 2022-23, 2023-24 (RE), 2024-25 (BE), Estimates of Gross Fixed Capital Formation (Public Sector) Maharashtra 2011-12 to 2022-23 (Base year 2011-12), वार्षिक उद्योग पाहणी 2021-22 व 2022-23 इ. अद्ययावत आकडेवारी असलेल्या विविध माहितीपूर्ण अहवालांचे प्रकाशनही मा.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.