– आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिला विरुद्ध गुन्हा दाखल
कामठी :- पैशांच्या व्यवहाराची माहिती पत्नीला दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर कारखाना चालकाने आत्महत्या केल्याची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला कामगाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद रामटेके (५५, रा. येरखेडा, कामठी) हे ‘रीना फूड्स’ नावाने चकली बनविण्याचा वखार चालवत होते. २५ ऑगस्ट रोजी त्यांनी कारखान्यात आत्महत्या केली. या घटनेच्या तपासादरम्यान पैशांच्या व्यवहाराचा मुद्दा समोर आला.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी प्रमोद यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कामिनी डोनारकर (३५) हिच्या बँक खात्यात ऑनलाइन दोन हजार रुपये पाठविले होते. या व्यवहाराची माहिती कामिनीने प्रमोद यांच्या पत्नी रीना यांना फोनवरून दिली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी उपलब्ध पुरावे व जबाबांच्या आधारे कामिनी डोनारकर हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





