– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
किशोर साहू, मौदा :- दिवाळीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन यावा, या सामाजिक भावनेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने तसेच राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली चाचेर येथे दिव्यांग बांधव व गरजू लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग बांधवांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सण-उत्सवाच्या काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खऱ्या अर्थाने समाजसेवा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग बांधव आणि गरजू घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.
“मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
रामटेक विधानसभा क्षेत्रातील बळीराजा पांधन रस्ता समिती सदस्य विकास झाडे, शिवसेना समन्वय राहुल सोमनाथे सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन या आनंदाच्या शिधाचे वाटप करत व लाभार्थ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत.






