spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाल मातीतून साकारला भव्य ‘किल्ला प्रतापगड’; छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत!

नागपूर :- किल्ला प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट शौर्य, बुद्धिमत्ता आणि रणनीतीचे प्रतीक आहे. १० नोव्हेंबर १६५९ रोजी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफाट सैन्य आणि शक्तीचा गर्व असलेल्या अफझलखानाच पराभव करून मराठा साम्राज्याच्या स्वाभिमानाचा झेंडा रोवला होता. शिवरायांच्या याच पराक्रमी इतिहासाची आणि गड-किल्ल्यांच्या परंपरेची प्रेरणा घेत रामकृष्ण नगर, उमरेड रोड, दिघोरी येथील श्री वीर हनुमान सेवा समितीतर्फे श्री वीर हनुमान मंदिर परिसरात भव्यदिव्य अशा लाल मातीपासून बनवलेल्या ‘किल्ला प्रतापगड’ची देखणी उभारणी करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक व अप्रतिम किल्ल्याचा भव्य अनावरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक  पिंटू झलके, हिंदू एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील साळुंखे, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अमर धरमारे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते  सुरेश सवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी बाल मावळ्यांच्या कलागुणांचे, कष्टाचे आणि सांस्कृतिक जपणुकीचे भरभरून कौतुक केले.

सदरील किल्ल्याच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक सुरज वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच किल्ला उभारणीत बाल मावळे मृदुल देशमुख, स्मित भुते, पारस दाते, स्वराज कुथे आणि हार्दिक सोनटक्के यांनी अत्यंत उत्साहाने व मेहनतीने सहकार्य करून हा भव्य किल्ला पूर्णत्वास नेला.

हा अप्रतिम किल्ला व शिवरायांच्या इतिहासाची प्रचिती देणारी ही कलाकृती नागरिकांना पाहण्यासाठी दररोज सायंकाळी ०६:०० ते रात्री ०९:०० या वेळेत उघडी राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी व बालगोपाळांनी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन वीर हनुमान सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles