गडचिरोली :- युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे, यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार आयोजन करते. राज्यात सन 2026-27 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे आयोजन दि. 10 ते 12 जानेवारी, 2027 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन दि. 19 नोव्हेंबर,2026 रोजी करण्यात येणार होते परंतु तांत्रिक कारणामुळे 19 एवजी 26 नोव्हेंबर,2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर YBYLD मध्ये करण्यात आले असुन तो विकसित भारत @2047 या दृष्टिकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर NYF-VBYLD-202७ जानेवारी 2027 मध्ये दिल्ली येथे होणार आहेत.
त्यास अनुसरुन गडचिरोली जिल्ह्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य, कवितालेखन या स्पर्धात्मक बाबीत समाविष्ठ आहेत.
सदर युवा महोत्सवाकरीता आवश्यक असलेले नियम, सहभाग कलाकार संख्या, कला सादरीकरणाकरीता आवश्यक असलेला वेळ याबाबतचा संपुर्ण तपशिल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावे.
सदर सर्व स्पर्धासाठी “Nasha Mukt Yuva for Viksit Bharat” ही संकल्पना (Theme) जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर समान राहील. मागील वर्षीच्या राष्ट्रीय स्तरावरील सहभागी युवा व युवतींना यावर्षीच्या VBYLD-2027 मध्ये सहभागी होता येणार नाही. जिल्हास्तर युवा महोत्सवात प्राविण्य प्राप्त केलेला संघ/युवा कलाकार यांना त्यांनी प्राविण्य प्राप्त केल्यानुसार विभागस्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. त्यानुसार विभागावर प्राविण्य प्राप्त झाल्यास राज्यस्तरावर व राज्यस्तरावरुन प्राविण्य प्राप्त केल्यास राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच प्रत्येक स्तरावर प्राविण्य प्राप्त झाल्यास शासनाकडून प्राविण्य प्राप्त युवा कलाकार, युवा संघ यांना रोख पारितोषिक ही देण्यात येणार आहे.
सदर जिल्हास्तर युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभागी होवु शकतील (दि.17 ऑगस्ट, २०२६ या दिनांक रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी) जन्म तारखेबाबत सबळ पुरावा म्हणुन जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला my bharat portal वर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच my bharat portal वर नोंदणीनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोलीच्या गुगल फॉर्म मध्ये नोंदणी करून ऑफलाईन नोंदणीचा विहीत नमुना कार्यालयातुन प्राप्त करुन घेऊन विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज व ओळखपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. 25 नोव्हेंबर,2026 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावे. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी कळविळे आहे.






