– ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक
हंसराज, भंडारा :- गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेच्या आवाजाला फाटा देत कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी आणि बासोरा या गावांमधील गणेश मंडळांनी यंदा ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा कौतुकास्पद व आदर्श निर्णय घेतला आहे. ध्वनीप्रदूषण टाळून पारंपरिक संस्कृती जपत टाळ-भजनाच्या भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्याचा संकल्प या मंडळांनी केला आहे.
कारधा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांनी परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गणेशोत्सव शांततेत, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला मांडवी व बासोरा येथील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावता पारंपरिक वाद्यांचा आणि भजनाचा वापर करण्याचा निर्णय दोन्ही गावांतील मंडळांनी एकमुखाने घेतला.
या स्तुत्य निर्णयाचे कारधा पोलिसांच्या वतीने स्वागत आणि कौतुक करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपणारा सण असल्याने इतर मंडळांनीही या उपक्रमापासून प्रेरणा घ्यावी आणि शांततापूर्ण, डीजेमुक्त उत्सवासाठी पुढे यावे, असे आवाहन ठाणेदार सूर्यवंशी यांनी केले आहे. या दोन्ही गावांनी घेतलेल्या निर्णयामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून, समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.





