spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोषण आहार सप्ताहाचा शुभारंभ

भंडारा :- ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत पोषणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासह गरोदर माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित पोषण आहार सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी किशोरवयीन मुली तसेच गरोदर मातांचा पौष्टिक आहाराची टोपली देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे, अधिसेविका वंदना शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सुजाता दुधगावकर यांनी गरोदर मातांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, फळे तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचे आवाहन केले. गरोदरपणात नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. किशोरवयीन मुलींनी संतुलित व पोषणयुक्त आहार घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

आहारतज्ज्ञ चकोले यांनी संतुलित आहार, आवश्यक पोषक घटक, रक्तक्षय प्रतिबंध आणि योग्य आहार नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गरोदर माता, किशोरवयीन मुली तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विविध उपक्रमांचे आयोजन

पोषण आहार सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० सप्टेंबर रोजी पोषण रांगोळी, पोषण दागिने तसेच पोषण कविता व गाणे स्पर्धा होणार आहेत. ११ सप्टेंबर रोजी पोस्टर, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

१२ सप्टेंबर रोजी स्तनदा मातांसाठी विशेष मार्गदर्शन, आहार प्रदर्शन व आहारविषयक प्रात्यक्षिकांसह कांगारू मदर केअर (KMC) बाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. १४ सप्टेंबर रोजी ‘अन्नपूर्णा’ उपक्रमांतर्गत गरोदर मातांसाठी पौष्टिक व संतुलित आहाराचे महत्त्व आणि आरोग्यदायी गर्भधारणेसाठी आवश्यक पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

१५ सप्टेंबर रोजी पोषण जनजागृतीपर चर्चा सत्र, प्रश्नमंजुषा, वाद-विवाद स्पर्धा तसेच पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतून पोषणाबाबतच्या गैरसमजुती दूर करून योग्य आहाराच्या सवयी अंगीकारण्याचा संदेश दिला जाणार आहे.

‘सुदृढ माता, निरोगी बालक आणि पोषणसमृद्ध समाज’ घडविण्यासाठी नागरिकांनी पोषण आहार सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.