spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १००% पंचनामे करा ! 

– माजी आमदार देवेंद्र भुयार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ! 

वरूड तालुका प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्यात वरुड मोर्शी तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे कपाशी, सोयाबीन, तूर या १००% नुकसान झाले असून संत्रा व मोसंबी चि गळं सुद्धा ९0 % झालेली आहे शासनंतर्फे सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांमध्ये कागदपत्रांची कोणतीही अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे खरीप व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शासकीय पातळीवर नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, हे पंचनामे करत असताना कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, मोबाईल क्रमांक आणि जीओ टॅगिंग फोटो यांसारख्या विविध कागदपत्रांची व माहितीची सक्ती करत असल्याचे समोर आले आहे.

आधीच अस्मानी संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या कागदपत्रांच्या सक्तीमुळे अनावश्यक मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे देवेंद्र भुयार यांनी पत्रात म्हटले आहे.

ग्रामीण भागातील अनेक भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हर डाऊन, विजेचा लपंडावाचा मोठा प्रश्न आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना ही माहिती तातडीने गोळा करणे अशक्य होत आहे. केवळ कागदपत्रे वेळेत उपलब्ध नाहीत म्हणून प्रत्यक्ष नुकसान झालेले शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

“पंचनाम्याचा मुख्य हेतू हा प्रत्यक्ष झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे हा असायला हवा, ना की कागदपत्रांची पडताळणी करणे. त्यामुळे प्रशासनाने आधी केवळ प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या आधारे सरसकट १००% बाधित क्षेत्र म्हणून नोंद करून पंचनामे पूर्ण करावेत,” असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश काढून कोणत्याही कागदपत्रांअभावी पंचनामे रोखले जाणार नाहीत नाहक मनस्ताप शेतकऱ्यांना होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

Popular Articles