– ९८,७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असताना निवडणुकीची घाई कशासाठी ? मतदार नोंदणी पूर्ण होईपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करू नये, अशी मागणी
नागपूर :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ रोजी असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज विभागात प्रलंबित असून, त्यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यातील ६१ हजार ३७१ अर्ज प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित करीत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याची मागणी प्रा. सचिन काळबांडे यांनी प्रशासन व निवडणूक आयोगाकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर २०२६ होती.
२२ सप्टेंबर पर्यंत नागपूर विभागात १,९४,४०४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १,५९,१९२ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली होती. मात्र, शेवटच्या चार दिवसांत तब्बल ९८,७८२ अर्जांचा ओघ आला. ऑनलाइन नोंदणीसाठी केवळ दोन ठिकाणी लॉगिनची सुविधा उपलब्ध असल्याने अर्ज नोंदणीची प्रक्रिया मंदावली आणि मोठ्या संख्येने अर्ज ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने प्रलंबित राहिले, असा आरोप प्रा. काळबांडे यांनी केला आहे.
५ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातून मतदार नोंदणीची अंतिम यादी तयार करण्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप अंतिम मतदार यादी तयार नसल्याचे सांगितले. तसेच अद्याप मतदार यादी पेंडिंगमध्ये असल्याचेही कळविण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणुक असून , ५ ऑक्टोबर पर्यंत नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने नोंदणी प्रक्रियेत ९८,७८२ अर्ज प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती प्रा. काळबांडे यांनी दिली. अंतिम मतदार यादी अद्याप निश्चित नसताना निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत घाईगडबडीने राबविली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासन व निवडणूक आयोगाने एकाही पदवीधर मतदार आणि उमेदवारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नये, अशी मागणीही त्यांनी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीचे अर्ज प्रलंबित असताना निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्यामागे नेमके कोणते राजकारण आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सदर चुकीची पद्धत कोणाच्या इशाऱ्यावर राबविली जात आहे, याचा खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली. मतदारांना निवडणुकीची अंतिम उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊनही उमेदवार व मतदारांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम प्रशासन आणि निवडणूक आयोग करीत असल्याचा आरोप प्रा.काळबांडे यांनी केला. उमेदवारास एकूण किती मतदार राहतील, कोणत्या जिल्ह्यात किती मतदार नोंदणी झाली आहे, याची अंतिम माहितीच उपलब्ध नसताना निवडणूक घेणे योग्य आहे का, असा सवाल प्रा.सचिन काळबांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.








