spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेची बदनामी करू नका

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी डागली तोफ

मुंबई :- रोज उठून पेपरफुटी होत असल्याच्या खोट्या अफवा पसरवण्याचे काम संजय राऊत, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. परंतु पेपर फुटल्याचा एकही पुरावा यापैकी कुणीच देऊ शकले नाही. राज्यात कुठेही पेपरफुटी झालेली नाही. एमपीएससी आणि सीईटी सेलच्या अध्यक्षांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर सारे मूग गिळून गप्प बसले. महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था सक्षम होती आणि सक्षम आहे. महाराष्ट्रात अतिशय दर्जेदार शिक्षण मिळत आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची आणि इथल्या शिक्षणव्यवस्थेची बदनामी करू नका. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी इथल्या शिक्षणव्यवस्थेला दोष देणे बंद करा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका राहुल गांधी असल्याचे सांगत बन म्हणाले, तुमच्या आकांना जाऊन विचारा की पंजाबमध्ये, कर्नाटकात पेपरफुटी झाली त्यावर काय कारवाई केली? कोणावरही कारवाई केली नाही. उलट महाराष्ट्रात ना एमपीएससीचा पेपर फुटला, ना सीईटीचा पेपर फुटला. तुमच्याकडे एकही पुरावा नाही. हर्षवर्धन सपकाळ खोटे बोलल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत 60 टक्क्यांच्या आसपास गुण मिळाले आहेत.

ज्या औरंगजेब फॅन क्लबचे संजय राऊत तोंड फाटेपर्यंत कौतुक करतात, बाबराचे, मुघलांचे, अब्दालीचे कौतुक करतात, त्यांचा इतिहास अभ्यासक्रमातून हटवण्यात आला हीच त्यांची खरी पोटदुखी आहे. परंतु इथे आता मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराणा प्रतापांचा इतिहास शिकवला जाईल. मुघलांचे कौतुक आता बंद झाल्याने तुम्हाला शिक्षणव्यवस्था वाईट वाटते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र चालवण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी संजय राऊतांकडून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, असे बन यांनी फटकारले.

पंडित नेहरू आणि राहुल गांधींवर टीका केली की संजय राऊत पुढे येतात. सोनिया गांधींवर टीका केली की त्यांचे कौतुक करण्यासाठी संजय राऊत पुढे येतात. याच सोनिया गांधींचा ‘करप्शन क्वीन’ म्हणून सामनात उल्लेख केला होता हे संजय राऊत, तुम्हाला आठवते का? आता फक्त आणि फक्त राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी संजय राऊत राहुल गांधींची चाटुगिरी करत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि खासदारकीसाठी तुम्ही काँग्रेसची गुलामी करणार असाल तर या देशातील जनतेने काँग्रेसचे जहाज बुडवले आहे आणि काँग्रेसच्या नादाला लागल्यामुळे उबाठा गटाचेही जहाज बुडणार आहे, असे बन यांनी सुनावले.

पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल यातला फरकही संजय राऊतांना कळत नाही

सीईटी परीक्षेमध्ये पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल यात फरक असतो. हा फरक ज्यांना कळत नाही त्यांनी शिक्षणव्यवस्थेवर किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये. काँग्रेसच्या काळापासून सीईटी अस्तित्वात आहे. त्याही काळात अनेक विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये टॉपचे गुण मिळायचे आणि बारावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण यायचे. केवळ अफवा पसरवण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. हर्षवर्धन सपकाळ, हिंमत असेल तर मोटेगावकरांबद्दल अमित देशमुख यांना जाब विचारा आणि मग भाजपाला या संदर्भात भूमिका मांडायला सांगा, असे बन म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.