spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुष्ठरोगच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका त्वरित उपचार घ्या

– मनपा आरोग्य विभागाद्वारे कुष्ठरोग जनजागृती व शोध अभियान सुरू

नागपूर :- शरीरावरी पिवळा, लालसर डाग किंवा चट्टा, अंगावरील गाठी, कानाच्या जाड झालेल्या पाळ्या, स्नायूंचा अशक्तपणा यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, ते कुष्ठरोग असू शकते. त्यामुळे वेळीच निदान व्हावे, यासाठी लगेच आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार नि:शुल्क उपचार करुन घ्या, असे आवाहन नागपूर महानगरलिकेद्वारे करण्यात आले आहे. मनपाद्वारे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.‍ अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात कुष्ठरोग जनजागृती उपक्रमाच्या अंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे जनजागृती कार्यवाही केली जात आहे. कुष्ठरोग हा आजार एम. लेप्रा या जीवाणू च्या संक्रमणाने होतो. यामध्ये हे जीवाणू रुग्णाच्या त्वचेवर व मज्जासंस्थेवर आघात करतात. त्यामुळे शरीरावर चट्टे दिसतात व वेळेवर उपचार न झाल्यास विकृती होण्याची शक्यता असते. वेळेत कुष्ठरोगाचे निदान झाल्यास योग्य उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे रुग्णाच्या घरातील व संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही हा रोग होण्याची संभावना असते. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींनी देखील प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधी घेणे गरजेचे असते. कुष्ठरोग हा एम.डी.टी. औषधोपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. सुरुवातीलाच निदान झाल्यास कुष्ठरोगामुळे होणारी कोणत्याही प्रकारची विकृती टाळता येऊ शकते.

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग संदर्भात माहिती नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, २१२ कुष्ठरोग नवीन शोधलेले रुग्ण आहेत, त्यातील ४ लहान मुले, ११ विकृतीसह कुष्ठरुग्ण असलेले आहेत. तर १८२ एकापेक्षा जास्त चट्टे असलेले रुग्ण आहेत.

कुष्ठरोग उपचार पद्धती बाबत माहिती देताना सांगण्यात आले की एक चट्टा असणाऱ्या रुग्णांना ६ महिने औषधोपचार घ्यावा लागतो, तर जास्त चट्टे असणाऱ्या कुष्ठरुग्णांना १२ महिने औषधोपचार दिला जातो. योग्य वेळी उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असेही आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ३० जानेवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुसुम (कुष्ठरुग्ण सुरक्षित महाराष्ट्र) कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करून संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. जर कोणाला अंगावर फिकट व बधीर चट्टा दिसला तर त्यांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी. लवकर निदान व उपचारामुळे आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि विकृती टाळता येईल असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.