नवेगाव बांध :- राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेकडे कोणत्याही नागरिकाने दुर्लक्ष करू नये, असे आवाहन अर्जुनी मोरगावचे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांनी केले. मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळत असून, ‘एकही पात्र मतदार वंचित नाही, एकही अपात्र समाविष्ट नाही’ या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. बीएलओ घरी आल्यानंतर नागरिकांनी गणना अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत तसेच अर्जाची पोहोच पावती घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार कांबळे म्हणाले, “मतदार यादी ही लोकशाहीचा कणा आहे. ती अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” त्यांनी नागरिकांना ECINET ॲप किंवा मतदार पोर्टलवर स्वतःचे नाव तपासण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी एसआयआर प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.




