– भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांची गर्दी
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि आमदार सांस्कृतिक महोत्सव मध्य नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त सुप्रसिद्ध गायक डॉ. अभिजीत कोसंबी यांच्या ‘भीम संध्या’ या भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन मध्य नागपुरातील बारसेनगर येथे गुरुवारी (ता.१६) करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.अभिजीत कोसंबी यांच्या बुलंद आणि दमदार आवाजातील भीम गीतांनी उपस्थित हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमात उपमहापौर लिला हाथीबेड, नगरसेविका रेखा निमजे, स्वीटी भिसीकर, नगरसेवक तुषार लारोकर, हेमंत बरडे, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांच्यासह अनेक इतर पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्री.प्रवीण दटके यांच्या हस्ते डॉ. अभिजीत कोसंबी आणि स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण करावे,” असे आवाहन आमदार प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पात्रे यांनी केले.
‘साजरी भीम जयंती करू’
कार्यक्रमात डॉ. अभिजीत कोसंबी, गायिका ज्योती बनकर, नेहा तिडके आणि त्यांच्या ग्रुपने ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा’……., ‘ज्ञान सूर्य तू इसी जगत का’….., ‘साजरी भीम जयंती करू’…., आणि ‘दलितांचा राजा भीमराव माझा’.., माझं भिमाच नावच कुंकू लावीन रमान,….. ‘सोनियाची उगवली सकाळ’…….., ‘आकाश मोजतो मी भीमा तुझ्यामुळे’…..,’दिला दणका भीमराव कडाडला’…, यांसारखे भीम गीत सादर केले.








