– चिकणी (डो.) येथे तरुणांचा पुढाकार
– विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प
यवतमाळ :- नेर तालुक्यातील चिकणी (डो.) येथील तरुणांनी यंदा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. या उपक्रमांद्वारे त्यांनी महामानवांना अभिवादन करत समाजाप्रती बांधिलकी जपली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिकणी डोमगा येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा व शाळेच्या विकासाचा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षिका शशिकला डोंगरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण अरसोड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल गणवीर, मुख्याध्यापक पंडीत वैद्य , शिक्षक मनोज माथने, कल्पना वैद्य, मिनाक्षी निमट, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुग्रीव बांबोर्डे, शालू डोंगरे, नीता बोरकर, सुनिता चव्हाण, आरती बोरकर उपस्थित होते. शाळेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले असून ते सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. जिल्हा परिषद शाळांचा विकास व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक शशिकला डोंगरे, कल्पना वैद्य (बोंद्रे), मिनाक्षी निमट, मनोज माथने, प्रभुचरण कोल्हे यांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. महादीप परीक्षेत यश मिळवत विमानचालन क्षेत्रात झेप घेणारा गुणवंत विद्यार्थी आयुष गोगटे याचा भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी शाळेला स्मार्ट गुगल टीव्ही देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना वह्या व पेनांचे वाटप करण्यात आले. अनाथ, एकल पालकत्व असणारे, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संजय डोंगरे, नीलकमल बोरकर, देवानंद बोरकर, विनोद चव्हाण, ताराचंद बोरकर, धम्मपाल मेश्राम, प्रमोद मेश्राम, योगेश रामटेके, धर्मेश गणवीर, गौतम मेश्राम, धम्मपाल घरडे, प्रफुल घरडे, धम्मपाल रामटेके, अमोल मेश्राम, सुशील घरडे, रवी मेश्राम, सुमेध चव्हाण, मिलिंद वासनिक, राहुल वासनिक, अमोल वासनिक, सुहास मडके, राजकमल बोरकर, सुधीर कापसिकर, राजकुमार मेश्राम आदींसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नपाल रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन ताराचंद बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी कापसीकर, संघपाल वासनिक, अमोल चव्हाण, अनिल बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.








