Home Latest News डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पी एम श्री न.प. राजेन्द्र हायस्कूलमध्ये विचारप्रबोधनाचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पी एम श्री न.प. राजेन्द्र हायस्कूलमध्ये विचारप्रबोधनाचा जागर

0
41

खापा, वार्ताहर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे अखंड पुरस्कर्ते व प्रखर विचारवंत विश्वरत्न, प्रज्ञासूर्ग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक राजेंद्र हायस्कूल येथे अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि विचारप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संपूर्ण परिसर निळ्या पताका, प्रेरणादायी घोषवाक्ये व बाबासाहेबांच्या उदात्त विचारांनी सजून उठला होता. ज्यामुळे वातावरणात एक प्रकारची बौध्दिक ऊर्जा व सामाजिक जाणीव निर्माण झाली होती.

कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापक सुनिल नेहारे व जेष्ठ शिक्षिका रेखा डोंगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा सखोल वेध घेत त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. शिक्षणाला दिलेले सर्वोच्च स्थान, सामाजिक विषमते विरुद्ध उभा केलेला लढा आणि न्याय, समता व बंधुता या मूल्यांचा त्यांनी केलेला प्रसार यावर विद्यार्थ्यांनी अत्यंत परिपक्वतेने भाष्य केले. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता सामाजिक भान जोपासण्याचे आवाहन केले. शिक्षक वृंदानेही विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांचे भान ठेवून जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी पर्यवेक्षक शश्यामराव खडके, निता चामाटे, असलम खान, प्रतिभा खोब्रागडे, ज्योती गजभिये, माला पारधी, सुरेखा येवले, भाग्यश्री सांडे, प्रमोद बावन‌कुळे, युवराज तायवाडे, लता राऊत, सोनाली तुमाने इ. शिक्षकगणांनी मार्गदर्शन केले. आरती नंदेश्वर यांनी कार्यमाचे सुत्रसंचालन केले. विजय नांदेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करण्याची व सामाजिक समतेच्या ध्येयासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. एकूणच हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता विद्यार्थ्यांच्या मनामनांत विचारांची ज्योत प्रज्वलिन करणारा आणि समाजभान जागृत करणारा ठरला, प्रेरणादायी, ज्ञानवर्धक, उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.