– किरण मिडब्रेन अकादमी तर्फे २९ इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार १९ जुलै रोजी
नागपूर :- डॉ. किरण मिडब्रेन अकादमीच्या वतीने देशातील होतकरू व गुणवंत मुलांच्या अद्वितीय प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड अँड वंडर बॉय रेकॉर्ड २०२६’ या भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन रविवार १९ जुलै रोजी, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी गडकरी वाडा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते देशभरातील गुणवंत व विक्रमवीर मुलांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले (नागपूरचे महाराजा), आयपीएस लोहित मतानी (उपआयुक्त, महामार्ग), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण तसेच नारायण एटेक्नो स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुलक्षणा भुयार हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बॉय रेकॉर्ड अंतर्गत ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांनी डोक्यावर पट्टी बांधून डोळे बंद करून स्मरणशक्ती, एकाग्रता, ओळख क्षमता व विविध बौद्धिक स्पर्धांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. अशा मुलांच्या असामान्य प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यांच्या आत्मविश्वासात व उत्साहात मोठी भर पडत आहे. याशिवाय सहभागी विद्यार्थ्यांची गुगल वेब लिस्टिंग, इंडिया टीव्हीवर थेट कव्हरेज तसेच इतर विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. किरण मिडब्रेन अकादमीच्या या उपक्रमामुळे देशातील लहान मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळून त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या प्रेरणादायी सोहळ्यास पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकांच्या यशाचा गौरव करावा, असे आवाहन आयोजक डॉ. किरण काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








