मनपाच्या विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद
नागपूर, ता. ९ : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या माझा बाप्पा, इको फ्रेंडली या आवाहनाला नागपुरातील गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याने यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत व शिस्तबद्धरितीने सुनियोजित पद्धतीने पार पडला. गणेशोत्सवाच्या काळात मनपाने विविध उपक्रम राबविले. या सामाजिक उपक्रमांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १ लाख ६२ हजार ०८५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर २०१.४१ टन निर्माल्य गोळा करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला होता. अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व अतिरिक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांना, मूर्तीकारांना, रोषणाई करणार्या व साऊंड सिस्टीम लावणाऱ्या सर्वांना विश्वासात घेण्याचे काम मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रारंभीच केले होती. यासंदर्भात गणेशोत्सवापूर्वीच कविवर्य सुरेश भट सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या सर्वांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच हा गणेशोत्सव साजरा करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, यासंदर्भात पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
यावेळी मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, दहाही झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, विभागीय स्वच्छता अधिकारी यांनी संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान चोख व्यवस्था राखण्यास सहकार्य केले.
ऑनलाईन नोंदणी सुविधा
गणेशोत्सव मंडळांना नोंदणीमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये, याकरिता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. दहाही झोन मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या नोंदणीची सुविधा पुरविण्यात आली. यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांना घरी बसून नोंदणी करणे शक्य झाले. झोनमध्ये अग्निशमन दल, वाहतूक विभागाची ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली होती.
मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मूर्तीचे स्थान महत्त्वाचे असते. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीच्या तयार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी, या उद्देशाने मनपाने शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. ही अभिनव स्पर्धेत ६०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच मनपाच्या विविध शाळांमध्येही अशीच अभिनव कार्यशाळा घेण्यात आली.
माझा बाप्पा, इको फ्रेंडली स्पर्धा, रक्तदान शिबिराला प्रतिसाद
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाने रोख बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत स्वयंस्फूर्तीने ९२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागपुरातील नागरिकांचा कल असल्याचे यातून स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मनपाने मुख्यालयासह शहरतील दहाही झोन मध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याद्वारे ६०० हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले.
विसर्जनाची व्यापक सुविधा
श्री. गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी मनापने यावर्षी व्यापक व्यवस्था केली होती. शहरातील विविध २१६ ठिकाणी ४१९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती. यामुळे नागरिकांना अधिक एका ठिकाणी थांबावे लागले नाही व कोणत्याही विसर्जन केंद्रांवर गर्दीचे चित्र दिसले नाही. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी सुद्धा महापालिकेने गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी व कच्छीविसा भागात मोठे विसर्जन तलाव निर्माण केले. यात ५ फुटापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना विसर्जन स्थळी जाऊन श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात अडचण येत असल्याच्या जाणिवेतून फिरते विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. दारासमोर विसर्जन कुंड या संकल्पनेनुसार प्रत्येक झोनमध्ये हे कुंड उपलब्ध करून दिले होते. केवळ फोन करून अनेकांनी घरासमोर लाडक्या बाप्पांना निरोप दिला.
निर्माल्य रथ
गणेशोत्सवांच्या काळात निर्माण होणारे निर्माल्याचे संकलन करण्यासाठी २१ निर्माल्य रथ मनपाने तयार केले होते. या निर्माल्य रथाच्या सहाय्याने शहरातील विविध विसर्जन स्थळांवर जमा होणारे निर्माल्य या रथांमध्ये एकत्रित करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या निर्माल्याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे.




