spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुरक्षित, सन्मानित आणि उज्ज्वल बालपणासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची प्रभावी भूमिका

सुरक्षित, सन्मानित आणि आनंदी बालपण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा केवळ तक्रार निवारण करणारा संस्थात्मक मंच नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. शासन, पालक, शिक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी समन्वयाने कार्य केल्यास बालकांवरील अत्याचार, शोषण आणि भेदभाव रोखणे शक्य होईल. प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण, समान संधी आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, हीच आयोगाची आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

बालकांच्या संरक्षणासाठी राज्याची बांधिलकी

बालक हे देशाचे भविष्य असून त्यांच्या सुरक्षित, सन्मानित आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे. बालकांवरील अत्याचार, शोषण, भेदभाव, बालमजुरी, बालविवाह, लैंगिक अत्याचार, ऑनलाईन छळ, शिक्षणापासून वंचित राहणे किंवा मानसिक त्रास अशा कोणत्याही परिस्थितीत त्यांना तातडीने संरक्षण आणि न्याय मिळावा, यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कार्यरत आहे. बालकांच्या संविधानिक आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्या तक्रारींची दखल घेणे आणि संबंधित यंत्रणांमार्फत प्रभावी कार्यवाही सुनिश्चित करणे हे आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

बालकांना मिळणारे मूलभूत हक्क

प्रत्येक बालकाला जन्मापासून जीवन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पोषण, विकास आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, सामाजिक किंवा आर्थिक स्थिती, अपंगत्व किंवा इतर कोणत्याही कारणावरून बालकांशी भेदभाव करता येत नाही. प्रत्येक बालकाला दर्जेदार आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, खेळ, विश्रांती, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा तसेच व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करण्याचा अधिकार आहे.

याशिवाय कोणत्याही बालकाचे अपहरण, तस्करी, विक्री, आर्थिक किंवा लैंगिक शोषण, बालमजुरी किंवा अंमली पदार्थांच्या गैरवापरात सहभागी होणे रोखणे ही राज्य आणि समाजाची जबाबदारी आहे. कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या तसेच मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग बालकांना विशेष संरक्षण, सन्मानपूर्वक जीवन आणि समाजात सक्रिय सहभागाची संधी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

आयोगाची कार्यक्षेत्रे आणि जबाबदाऱ्या

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग बालकांच्या हितासाठी विविध स्तरांवर काम करतो. बालकांवरील अत्याचार, शोषण, दुर्लक्ष आणि भेदभावासंदर्भातील तक्रारींची चौकशी करून त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाते. बाल संरक्षणासंबंधीचे कायदे, धोरणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही यावर आयोग देखरेख ठेवतो.

बालगृहे, निरीक्षण गृहे, विशेष गृहे आणि इतर बालसंस्थांची नियमित पाहणी करून तेथील सुविधा आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित केले जाते. तसेच बाल संरक्षण, शिक्षण, आरोग्य व पोषण, बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, पोक्सो कायद्याची अंमलबजावणी, बालतस्करी प्रतिबंध आणि बालहक्कांविषयी जनजागृती यांसारख्या विषयांवर आयोग सातत्याने काम करतो.

संकटात सापडलेल्या बालकांसाठी मदतीचा आधार

घरातून पळून गेलेली किंवा हरवलेली मुले, रस्त्यावर राहणारी मुले, बालमजूर, घरगुती काम करणारी मुले, लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराला बळी पडलेली मुले, तस्करीची शिकार झालेली मुले, भावनिक आधाराची गरज असलेली मुले तसेच पालकांनी सोडून दिलेली मुले अशा संकटग्रस्त बालकांच्या संरक्षणासाठी आयोग विविध यंत्रणांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

कोणत्याही बालकासोबत शोषणाची घटना घडल्यास संबंधित पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधता येतो. प्रत्येक जिल्ह्यात बाल न्याय व्यवस्था उपलब्ध असून बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाते.

बाल न्याय मंडळाची भूमिका

कायद्याच्या विरोधात आढळलेल्या किंवा गुन्ह्यात आरोपित असलेल्या मुलांनाही सन्मानपूर्वक आणि न्याय्य वागणूक मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले बाल न्याय मंडळ (Juvenile Justice Board) संबंधित प्रकरणांवर सुनावणी करून पुनर्वसन आणि न्याय या दोन्ही बाबींना प्राधान्य देते.

बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी उपक्रम

बालकांच्या संरक्षणासाठी केवळ शासन नव्हे तर समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने राज्यात मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच बालविवाह, बाल संरक्षण आणि शिक्षण यावर भर देणारी बालस्नेही पंचायत राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बालकांपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकारी या बालस्नेही पंचायतच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. हा उपक्रम राबविण्यासाठी युनिसेफ आणि यशदा यांच्या सहकार्याने विविध गावांमध्ये बालस्नेही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बालकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मन मुक्त फाऊंडेशनच्या सहकार्याने दहा जिल्ह्यांमध्ये विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यात शाळांमध्ये मॅजिक बॉक्स थिंकिंग कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि सकारात्मक विचारक्षमतेचा विकास केला जात आहे.

प्रशिक्षण, जनजागृती आणि सायबर सुरक्षा

बाल सुरक्षा अभियानांतर्गत शिक्षक, पोलीस अधिकारी, महिला व बालविकास विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींसाठी राज्यभर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. बालकांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारीविषयी मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जात आहेत.

होप फाउंडेशनच्या सहकार्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बालस्नेही कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पोक्सो कायद्यानुसार नियुक्त सहायक व्यक्तींसाठी नियमित प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजनही आयोगामार्फत केले जाते.

भविष्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम

बाल संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी आयोगाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम प्रस्तावित केले आहेत. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात बालकलाकारांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. गावांच्या पुरस्कार निकषांमध्ये बालसुरक्षेचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. तृतीयपंथीय बालकांसाठी स्वतंत्र धोरण, लहान मुलांच्या ऑनलाईन वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सर्व विभागांसाठी एकसमान कार्यपद्धती (SOP) विकसित करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय ग्रामस्तरावर बालपंचायतींचे बळकटीकरण, बाल सुरक्षा पथके, बालमजुरीविरोधी विशेष मोहीम, बालविवाह प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती तसेच एनएसएस स्वयंसेवक, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून चाईल्ड हेल्प ग्रुप स्थापन करण्याची योजना आहे.

चाईल्ड हेल्पलाईन : तातडीच्या मदतीसाठी विश्वासार्ह सेवा

कोणतेही बालक संकटात असल्यास किंवा बालहक्कांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि आपत्कालीन सेवा ११२ या २४ तास, वर्षभर मोफत उपलब्ध असलेल्या सेवांवर संपर्क साधता येतो. या माध्यमातून बालकांना तातडीची मदत, संरक्षण, समुपदेशन आणि आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही उपलब्ध करून दिली जाते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.