खापा, वार्ताहर :- हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि. २८ मे) ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा सण साजरा करण्यात आला. ईद उल अजहा निमित्त शहरातील प्रसिध्द दर्गा पर्यटन स्थळ “क” दर्जा प्राप्त हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद येथील ईदगाहमध्ये सकाळी आठ वाजता विशेष नमाज अदा करण्यात आली. यानंतर हजरत इब्राहिमी सुन्नत (कुर्बानी) अदा करण्यात आली. ईद-उल-अजहा संदर्भात प्रशासनानेही आवश्यक ती व्यवस्था केली. नवतपा सुरू असून, उष्णतेची लाट सुरू आहे. हे लक्षात घेऊन नमाज पठण करणाऱ्या समाज बांधवांसाठी मशीद कमिटीच्या वतीने ईदगाहमध्ये मंडप टाकून सावली करण्यात आली. तसेच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खापा पोलीस प्रशासनाद्वारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
यासाठी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर (बब्लू) शेख, सचिव मकसूद शेख, उपाध्यक्ष सईद कुरेशी, सहसचिव आशिक पठाण, गुड्डू पठाण, सदस्य मस्तान कुरेशी, अहफाज कुरेशी, रफिक (छल्लू)शेख, इसराईल (भुरू) शेख, सलमान कुरेशी, खापा मस्जिदचे मौलाना मकसुद आलम, मोज्जन साबिर (गुड्डू) शेख यांनी ईदच्या नमाज पठणसाठी विशेष नियोजन केले. शहरातील ज्येष्ठ नागरिक, समस्त समाज बांधव व लहान मुले उपस्थित होते.
“विश्र्वशांती आणि देशासाठी विशेष प्रार्थना”
नमाज पठणानंतर मुस्लिम समाजबांधवांनी जगात व देशात शांतता, जातीय सलोखा आणि एकात्मता कायम राहावी, अशी प्रार्थना केली. यासोबतच राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशीही प्रार्थना करण्यात आली.
“परंपरेनुसार बकऱ्याची कुर्बानी”
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष धार्मिक महत्त्व असते. परंपरेनुसार या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि त्यानंतर मिळालेल्या मांसाचे तीन भाग केले जातात. त्यातील एक भाग स्वतःसाठी, दुसरा नातेवाईक आणि मित्रांसाठी, तर तिसरा भाग गरिब आणि गरजू लोकांसाठी दिला जातो. धार्मिक परंपरेनुसार हे वाटप पूर्ण झाल्यानंतरच कुर्बानी वैध मानली जाते. यंदाही अनेक ठिकाणी ही परंपरा पाळण्यात आली. शहरातील मुस्लिम समाजाने श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत बकरी ईद साजरी केली.




