Thursday, April 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशपूर ग्रामपंचायतीच्या ‘दुजाभावा’विरोधात एल्गार; वॉर्ड सदस्या चित्रा वैद्य नागरिकांसह उपोषणाला

हंसराज,भंडारा गणेशपूर :- भंडारा तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या आंबेडकर वॉर्डातील समस्यांबाबत वारंवार दाद मागूनही प्रशासन दाद देत नसल्याने, अखेर वॉर्ड सदस्या चित्रा अनिल वैद्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वॉर्डातील नागरिकांसह त्यांनी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ सुरू केले आहे. गेल्या १३ वर्षांपासून या वॉर्डाकडे होत असलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाचा ‘दुजाभाव’ याविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

आंबेडकर वॉर्डात प्रामुख्याने कष्टकरी आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय समाज वास्तव्यास आहे. या भागाच्या विकासासाठी चित्रा वैद्य गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात आहे. विशेष म्हणजे, वॉर्डातील काही भागांत गेल्या ७ वर्षांपासून नळाला पाणीच आलेले नाही. अनिल वैद्य ते इंदु मेश्राम आणि कैलास कांबळे ते विनोद हुमणे यांच्या घरापर्यंतच्या परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ७ वर्षांपासून ही समस्या कायम असताना प्रशासन ढिम्म हलत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

वॉर्डातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाल्यांवरील सिमेंटचे कव्हर पूर्णपणे फुटलेले असून, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. उघड्या नाल्या आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा नाल्यांमध्ये पडून लहान मुले व वृद्ध जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. हे फुटलेले कव्हर बदलून नवीन कव्हर बसवण्याची मागणी वारंवार करण्यात आली, परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप चित्रा वैद्य यांनी केला आहे.

आज सकाळपासूनच चित्रा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डातील नागरिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. “वॉर्डातील रस्ते, बंदिस्त नाल्या आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न जोपर्यंत लेखी आश्वासनासह मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

प्रमुख मागण्या:

🔹 गेल्या ७ वर्षांपासून बंद असलेला पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा.

🔹 नाल्यांचे फुटलेले जुने कव्हर काढून नवीन कव्हर बसवावेत.

🔹 वॉर्डातील रखडलेले सिमेंट रस्ते आणि पथदिव्यांची कामे पूर्ण करावीत.

🔹 साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम राबवावी.

गेल्या १३ वर्षांपासून हा वॉर्ड विकासापासून वंचित राहिल्याने येथील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना आहे. आता या उपोषणामुळे तरी प्रशासन जागे होणार की आंदोलनाला हिंसक वळण लागणार, याकडे संपूर्ण भंडारा तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com