कामठी :- रक्षाबंधन पर्वानिमित्त सेंट जेनेली कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने नवीन कामठी पोलीस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी पोलिस बांधवांच्या हातावर प्रेम, स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक असलेली राखी बांधून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती विद्यार्थिनींनी व्यक्त केलेल्या आपुलकीमुळे पोलीस ठाण्यात भावनिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी पोलिसांना मिठाई देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रेमळ उपक्रमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे भावूक झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. तसेच पोलिसांकडील शस्त्रांबाबत आवश्यक माहिती देत त्यांचा वापर व कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांच्या कार्याबद्दल कुतूहल व आदर निर्माण झाला.
याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक मनीष बन्सोड, पोलीस उपनिरीक्षक सृष्टी कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अखिलेश ठाकूर, हेड कॉन्स्टेबल दीप्ती मोटघरे, योगीराज अमृते, मधुकर रंगारी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सेंट जेनेली कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रबंधक सिस्टर दिव्या मॅडम, उपप्राचार्या सिस्टर लीना मॅडम, मायकल सर, विजेता, हेमा, कविता मॅडम, धनंजय, विजेंद्र, अश्विन सर तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी पोलिस आणि समाजातील नाते अधिक दृढ करणारे असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींनी पोलिसांना आपले भाऊ मानून रक्षाबंधन साजरे केल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला.
या उपक्रमातून ‘पोलिस हे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारे अधिकारी नसून समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले आपलेच कुटुंबीय आहेत’, हा भावनिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. सेंट जेनेली शाळेच्या या उपक्रमाचे नवीन कामठी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.





