spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सहभाग आणि दर्जेदार नियोजनावर भर द्या – कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

नवी मुंबई :- महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’  दि. 22 जुलै 2026 ते दि. 02 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीचा आणि आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आढावा बैठक घेतली.

या बैठकीसाठी कोंकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सर्व अपर आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार (महसूल) व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रत्येक जिल्ह्याकडून आतापर्यंत झालेल्या तयारीची सविस्तर माहिती घेतली आणि हे अभियान सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, हे अभियान केवळ एक नावापुरते किंवा शासकीय सोपस्कार म्हणून पार पाडण्याचा कार्यक्रम नाही. प्रशासनाची पोहोच ही प्रत्येक विभागापर्यंत आणि शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत अचूक झाली पाहिजे. मागील तीन महिन्यांत बहुतांश ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन अत्यंत कष्टाने आणि कौतुकास्पद काम केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिबीराचे नियोजन हे दर्जेदार, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असले पाहिजे, तसेच लाभार्थींची निवड अत्यंत काळजीपूर्वक, प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने झाली पाहिजे.

सध्या सुरू असलेली पावसाची स्थिती आणि दमट वातावरण लक्षात घेता आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आरोग्य व खाद्यान्नाच्या बाबतीत अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करताना स्थानिक महिला बचत गट आणि सेवाभावी संस्थांना (NGO) प्राधान्य द्यावे, जेणेकरून त्यांना हक्काचा रोजगार मिळेल आणि व्यवस्थाही उत्तम राहील. परंतु, पावसाळ्याचे दिवस असल्याने अन्नाचा दर्जा उत्तम असणे अनिवार्य आहे. अन्नाच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. फूड पॉयझनिंग (अन्नबाधा) होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.

मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये या विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी हे अभियान २२ जुलै, २५ जुलै व २६ जुलै २०२६ या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, २५ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘आषाढी एकादशी’ असल्याने राज्यातील जनता तसेच अनेक लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. हीच बाब लक्षात घेऊन आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीचा आदर करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज, १३ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन पूरकपत्रानुसार आता हे अभियान दि. २२ जुलै २०२६ ते दि. ०२ ऑगस्ट २०२६ या वाढीव कालावधीत आयोजित केले जाईल. या संपूर्ण कालावधीतील कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

शासनाच्या या लोककल्याणकारी अभियानाचा आणि वाढीव कालावधीचा  लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात तात्काळ पत्रकार परिषदा (प्रेस कॉन्फरन्स) आयोजित करुन जनजागृती करावी, असे आदेशही आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले. स्थानिक माध्यमांच्या माध्यमातून या शिबिरांचे ठिकाण, वेळ आणि उपलब्ध होणाऱ्या सेवांची व्यापक प्रसिद्धी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त जनतेला या ‘महाराजस्व अभियानाचा’ थेट लाभ घेता येईल. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध दाखले आणि शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली तात्काळ देण्याचा प्रशासनाचा मानस असून, कोंकण विभागातील सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागयी महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यावेळी केले.

Popular Articles