– न्याय न मिळाल्यास २ एप्रिलला नागपूर उपसंचालक कार्यालयावर धडक देणार; कर्मचाऱ्यांचा इशारा
भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील ट्युटर रेखा मेश्राम यांच्यावर प्रशासनाने अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करत, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने (आरोग्य विभाग) एल्गार पुकारला आहे. या अन्यायाविरोधात २५ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डातील बेड आणि भिंती प्रशिक्षणार्थी नर्सिंग विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्या जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, या चौकशी समितीने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या ट्युटर रेखा मेश्राम यांची कोणतीही चूक नसताना त्यांना दोषी ठरवले. याच अहवालाच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सकांनी मेश्राम यांची तडकाफडकी रुग्णालयात बदली केली.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने (कामगार कर्मचारी शाखा) या बदलीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने आणि अन्यायाची असल्याचे सांगत संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन ही बदली रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने आपली भूमिका लवचिक न ठेवता कठोर पवित्रा घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
प्रशासनाने अन्यायाचे परिमार्जन न केल्याने अखेर संघटनेच्या वतीने २५ मार्च रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात धरणे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ‘रेखा मेश्राम यांना न्याय द्या’ आणि ‘अन्यायकारक बदली रद्द करा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
भंडारा येथील आंदोलनानंतरही जर प्रशासनाने रेखा मेश्राम यांच्यावरील अन्याय दूर केला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. येत्या २ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथील उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग (नागपूर परिमंडळ) यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली असून, आता वरिष्ठ प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








