spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समीकरणे बदलणार; रामटेकमध्ये निवडणूक बहुरंगी..कोण मारणार बाजी! 

– जि.प. व पं. स. आरक्षणाची प्रतीक्षा इच्छुक उमेदवारांची धावपळ, मोर्चेबांधणीला वेग

– नव्या सर्कलनुसार पुन्हा सुरू झाले गणितांचे समीकरण

सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, रामटेक तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. तहसील कार्यालय, रामटेक येथे येत्या १३ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १७ जानेवारी २०२५ रोजी संपला होता. मात्र, निवडणुका न घेता जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे व अधिसूचना महिनाभरात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

नव्या सर्कलनुसार नव्या समीकरणांची जुळवाजुळव

मागील निवडणुकीत नगरधन-भंडारबोडी सर्कलमधून काँग्रेसचे दुधराम सव्वालाखे, मनसर-शीतलवाडी सर्कलमधून भाजपचे सतीश डोंगरे, कांद्र-सोनेघाट सर्कलमधून शिवसेना (शिंदे गट) चे संजय झाडे, बोथिया-पालोरा सर्कलमधून गोंगपाचे हरीश उईके, तर वडंबा सर्कलमधून काँग्रेसचे शांता कुंभरे विजयी झाले होते. मात्र, या वेळी नव्या सर्कलनुसार मतदारसंघांची फेररचना झाल्याने काही नेत्यांचे राजकीय गणितच विस्कटले आहे.

अशी आहेत नव्याने निश्चित सर्कल

१) नगरधन-शीतलवाडी,

२) मनसर-कांद्री

३) भंडारबोडी-सोनेघाट

४) बोथिया-पालोरा

५) वडंबा जिल्हा परिषद सर्कल

निवडणुकीत ठरणार हे मुद्दे निर्णायक

१) या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाचे भाव, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, विकासकामांतील विलंब,

२) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यासह काँग्रेसचे दोन दिग्गज उदयसिंग (गज्जु) यादव व दुधराम सव्वालाखे-यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा मुद्दा विशेष ठरणार आहे.

सर्वांचे लक्ष सोडतीकडे 

रामटेक तालुक्यातील ५ जिल्हा परिषद सर्कल आणि १० पंचायत समिती गणांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. नव्या आरक्षणानंतर कोण मैदान मारते व सर्कलनुसार आरक्षण काय सुटते हे पाहण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे आणि जनतेचेही डोळे तहसील कार्यालयाच्या सोडतीवर खिळले आहेत.

Popular Articles