किशोर साहू, मौदा, ता.१३:- अभिजात मराठी भाषा सप्ताह उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे भव्य पुस्तक प्रदर्शनी भरवण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटन तोंडली गावचे उपसरपंच रामपाल धांडे, शाळा व्य.स. अध्यक्ष प्रभाकर तिजारे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये विविध लेखकांची, कविची मराठी साहित्याची पुस्तके प्रदर्शनामध्ये ठेवली होती. विद्यार्थ्यांनी त्याविषयी प्राथमिक माहिती दिली. प्रदर्शनी पाहण्याकरता पालक तसेच गावकरी याचा उस्पूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. आपल्या भावना व्यक्त करण्यापासून यशाची शिखरे गाठेपर्यंत मराठी साहित्य आपल्याला नेहमीच मदत करते.

पुस्तक प्रदर्शनातील सर्व पुस्तके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली ग्रंथालयातील असून ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात. महावाचन चळवळीमार्फत विद्यार्थ्यांचे वाचनात भर पडून त्यांची शब्द संपत्ती वाढ तसेच विचार क्षमता प्रगल्भ करण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा आहे. असे नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडत आहे हे बघून पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे तसेच सहशिक्षक निलेश जाधव यांचे कौतुक केले.








