spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सत्तर वर्षांनंतरही सामान्य माणूस सामान्यच! राजकीय व्यवस्थेत परिवर्तनाची गरज – रघुनाथ सोनटक्के

– महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार; मतदार पत्रिकेतील अनुक्रमांक ३१ वर मतदान करण्याचे आवाहन

नागपूर :- गेल्या सत्तर वर्षांपासून सामान्य माणसाच्या जीवनात अपेक्षित परिवर्तन झालेले नाही. सामान्य जनता आजही आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय व्यवस्थेत परिवर्तन होणे आवश्यक असून, सामान्य माणसांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रघुनाथ पुंडलिक सोनटक्के यांनी व्यक्त केली आहे. मतदार पत्रिकेतील आपला अनुक्रमांक ३१ असून, पदवीधर मतदारांनी आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

रघुनाथ सोनटक्के यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीच्या राजकारणात वारंवार तेच तेच नेते पुढे येतात, पुन्हा निवडून येतात; मात्र सामान्य जनतेच्या जीवनात अपेक्षित बदल घडवून आणण्यात ते अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत सामान्य नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसतांना, अनेक राजकीय नेत्यांची संपत्ती मात्र वाढत गेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात नव्या चेहऱ्यांना आणि सर्वसामान्यांच्या अनुभवातून पुढे आलेल्या व्यक्तींना संधी मिळणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणे आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर राजकीय क्षेत्रात प्रभाव निर्माण करणे, ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे सोनटक्के यांनी नमूद केले. राजकारण हे केवळ संपत्ती, प्रतिष्ठा किंवा सत्तेचे साधन न राहता जनसेवेचे माध्यम बनले पाहिजे. दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या नेत्यांनी नव्या पिढीला आणि सामान्य नागरिकांना संधी देण्याचा विचार करावा. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत सामान्य माणसाला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यासच त्याच्या समस्या सभागृहात मांडल्या जातील आणि लोकशाही अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासगीकरणामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या समस्यांकडेही सोनटक्के यांनी लक्ष वेधले आहे. अनेक क्षेत्रांत कंत्राटी आणि खासगी स्वरूपाच्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कर्मचाऱ्यांना कमी वेतन, रजांचा अभाव, भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) सुविधा नसणे, विमा संरक्षण न मिळणे आणि नोकरीची शाश्वती नसणे अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेहनत करूनही कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगण्याची हमी मिळत नसेल, तर ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. कामगारांना योग्य वेतन, आवश्यक रजा, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण आणि रोजगाराबाबत स्थैर्य मिळावे, यासाठी प्रभावी धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून केवळ प्रतिनिधी निवडण्या पुरता विचार न करता, सुशिक्षित बेरोजगार, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि सामान्य कुटुंबांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा प्रतिनिधी निवडण्याची आवश्यकता असल्याचे सोनटक्के यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले आहे. सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणारा आणि त्याच्या हक्कांसाठी आवाज उठविणारा प्रतिनिधी विधान परिषदेत असणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी सामान्य माणसालाच राजकारणात संधी मिळाली पाहिजे, हा आपल्या उमेदवारी मागील प्रमुख विचार असल्याचे रघुनाथ पुंडलिक सोनटक्के यांनी सांगितले. निवडून आल्यास आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या प्रश्नांवर काम करण्याची हमी देत त्यांनी पदवीधर मतदारांना आपल्या उमेदवारीचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदार पत्रिकेवरील अनुक्रमांक ३१ वर मतदान करून आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रघुनाथ पुंडलिक सोनटक्के (बी.ए.) यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून आपली भूमिका मांडली असून, राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पदवीधर मतदारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Popular Articles