spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माओवाद्यांनी जमिनीत पुरलेली स्फोटके जप्त

– गॅरापत्तीच्या जंगलात घातपाताचा कट उधळला

– सी-६० जवानांची मोठी कारवाई

गडचिरोली :- माओवादाचा प्रभाव आता संपत चालला असून, यापूर्वी सुरक्षा दलांवर घातपात घडविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले शस्त्र व स्फोटक साहित्याचा साठा गडचिरोलीपोलिस दलाने शोधून जप्त केला आहे. बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती येथे राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

गॅरापत्ती पोलिस ठाणे हद्दीतील टव्वे जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य गोपनियरित्या जमिनीत पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० या विशेष पथकाच्या गडचिरोली व प्राणहिताच्या ४ तुकड्या व बॉम्ब शोधक व नाशक ( बीडीडीएस) ची दोन पथके तातडीने संबंधित जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना झाली. जंगल अतिदुर्गम व आंतरराज्यीय सीमावर्ती भागात असल्याने जवानांनी अत्यंत सतर्कतेने कसून तपासणी केली. यावेळी बीडीडीएस पथकाच्या जवानांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा शोधून काढला.

जप्त केलेले साहित्य असे…

घटनास्थळावरून पोलिसांनी खालीलप्रमाणे स्फोटक व माओवादी साहित्य हस्तगत केले आहे. यात ११ नग कुकर, कॉर्टेक्स वायरचे ३ बंडल , ३ किलो गन पावडर, ४ डेटोनेटर, १ बॅटरी , २५० ग्रॅम फटाका बारूद, ४ स्टील कंटेनर, ८ वायर बंडल, १ नग सोलर प्लेट व इतर माओवादी साहित्य जप्त केले.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम फत्ते

पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये व अपर अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे., तसेच उप-अधीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. या मोहिमेत विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलीजन्स सेल व बीडीडीएस जवानांनी कामगिरी बजावली.

Popular Articles