spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुण्यात बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश; १३ जण अटकेत, २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे प्रतिनिधी :- अन्नपदार्थांतील भेसळीविरोधात पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी संयुक्त कारवाई करत सिंथेटिक (बनावट) दूध तयार करून विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली असून २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हजारो लिटर संशयित दूध आणि मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले.

तपासानुसार, पुणे जिल्ह्यातील मंचर हे या रॅकेटचे प्रमुख केंद्र असल्याचा संशय असून अकलूज, अहिल्यानगर, सिल्लोड आणि सांगली येथेही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ३० सदस्यीय पथकाने ही कारवाई केली असून त्यांना एफडीएच्या २० हून अधिक अधिकाऱ्यांची साथ लाभली.

कारवाईदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील उत्पादन केंद्रातून दूध घेऊन येणाऱ्या टँकरची तपासणी करण्यात आली. दूधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून भेसळीचा संशय आल्याने २८ हजार ४९८ लिटर दूध जप्त करून ते नाशवंत असल्यामुळे नष्ट करण्यात आले. तसेच अहिल्यानगर येथील एका संकलन केंद्रातून २४ हजार ४९८ लिटर संशयित दूधही जप्त करून नष्ट करण्यात आले.

याशिवाय चुकीचे लेबलिंग, अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून ९२ हजार किलोहून अधिक विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या सर्व वस्तूंची तपासणी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अस्सल दुधात ५० टक्के सिंथेटिक दूध मिसळत असल्याचा संशय

तपासात आरोपी ग्राहकांना पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक १,००० लिटर अस्सल दुधामध्ये सुमारे ५०० लिटर रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले सिंथेटिक दूध मिसळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हे सिंथेटिक दूध रसायने, मिल्क पावडर, शॅम्पू आणि इतर घटकांचा वापर करून तयार केले जात होते. अशा प्रकारची भेसळ ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मोठ्या नेटवर्कचा शोध सुरू

ही संयुक्त कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी, संबंधित डेअऱ्या, विक्रेते आणि इतर मध्यस्थांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून भेसळयुक्त दूध पुणे आणि परिसरातील इतर जिल्ह्यांमध्ये पुरविण्यात आले होते का, याचाही तपास केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.