spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी फकीरजी महाराजांची यात्रा

यवतमाळ :- जिल्हा म्हणजे वैविध्यपूर्ण यात्रांचा जिल्हा.प्रत्येक यात्रेने आपले वैशिष्ट्य जपले आहे.काही यात्रांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे.आपल्या विविधतेतून समाजाला एकता आणि एकोप्याचा संदेश देणारी अशीच एक यात्रा यवतमाळ जिल्ह्यातील धनज माणिकवाडा या जुळ्या गावात गेली साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे.एका छोट्या नाल्याने विभाजित केलेले धनज आणि माणिकवाडा ही गावे. फकीरजी महाराजांच्या यात्रेचे जुळे गावं म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये कार्तिक प्रतिपदा व आषाढी प्रतिपदेला हा यात्रा महोत्सव असतो. नेर – बाभुळगाव रस्त्यावर आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या जुळ्या गावाने संपूर्ण विदर्भाला ,महाराष्ट्राला एकता, एकोपा,सहकारीता, सहभागीत्व आणि धर्मनिरपेक्षतेचा मूलमंत्र दिला आहे.यावर्षी सहा नोव्हेंबरला कार्तिक प्रतिपदेला हा यात्रा महोत्सव होत आहे.

350 वर्षांची परंपरा असणारी ही यात्रा पूर्वी या पंचक्रोशीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वार्षिक खरेदी विक्रीचा एक उत्सव म्हणूनही प्रसिद्ध होती. गृह उपयोगी व कृषी विषयक आवश्यक सर्व साहित्यांची,अवजारांची खरेदी पूर्वीच्या काळात या यात्रेमध्ये व्हायची. सर्व धर्मीयांना एकत्रित आणणारी ही एक पारंपारिक उत्सव प्रक्रिया आहे.

विदर्भातील संत परंपरा ही प्रामुख्याने प्रबोधनाकडे झुकलेली आहे.शक्ती, भक्ती सोबतच विरक्ती व त्यातून समाजाचे भले ही या परंपरेची वैशिष्ट्य आहे. संत गाडगेबाबा यांचे सामाजिक सुधारणा,शिक्षण, आरोग्य, स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम.संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामविकास,कीर्तनातून सामाजिक प्रबोधन, सामाजिक एकोप्याचे काम ज्या महापुरुषाने साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू केले होते…त्या फकीरजी महाराजांच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी लाखोंची गर्दी दरवर्षी जमते.

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती नामात निघणारी दिंडी, या दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषेतील नागरिक, भजनी पथक,विविध धार्मिक देखावे ,श्रद्धा व्यक्त करण्यासाठी घातले जाणारे लोटांगण,बाळ गोपाळांचा चित्ररथ,मानाची पालखीचा सहभाग असतो. त्यानंतर होणारी विशाल दहीहंडी, आणि एकत्रित सर्वांनी त्या दिवसाला कन्या भाकरीचा घेतलेला प्रसाद आहे. शेकडो डेगी मध्ये कन्या ( ज्वारी पासून तयार होणारा खाद्य पदार्थ ) तयार केल्या जातात.शिस्तीत लाखो लोकांना जेवण दिले जाते.

ही यात्रा या पंचक्रोशीतील अनेक गावांमधील शिधा एकत्रित करून सहकाराच्या तत्त्वावर सहभागीत्वातून करण्यात येते. यात्रेपूर्वी एक महिना हा शिधा गोळा करण्यात येतो. यात्रेच्या दिवशी दोन्ही गावातील प्रत्येक नागरिक आपल्या घरून महाप्रसादासाठी आवश्यक असणारा शिधा अर्थात महाप्रसादाला लागणाऱ्या पिठापासून तर भाजीपर्यंतच्या साहित्याला घेऊन मंदिरात जातो.प्रत्येक गावकऱ्यांचे असे सहभागीत व या महाप्रसादात असते.फकीरजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सामाजिक एकोप्याचा,सहभागीत्वाचा गावगाडा निर्माण केला होता.हे जुळे गाव आजही हा गावगाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

किमान साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवकालीन संत म्हणून

फकीरजी महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते. फकीरजी महाराज कोण होते ? कुठून आले ? याबद्दल त्यांच्या भक्तांमध्ये अनेक प्रवाद आहेत. मात्र त्यांचा विदेही संत म्हणून सगळ्यांनी स्वीकार केला आहे. संत फकीरजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सामाजिक एकोपा जपण्याची शिकवण दिली, ग्रामविकासावर त्यांचा भर होता,ते उत्तम पशुपालक आणि शेतीतज्ञ होते. ते उत्तम धन्वंतरी होते. ऐतिहासिक, धार्मिक सर्वच महापुरुषांप्रमाणे त्यांनीही विदेही संतपरंपरेत त्या काळातील गावगाड्याच्या नियमानुसार गुराख्याचे काम केले. तत्कालीन गोपालक समुदायांमध्ये गोधन वाचविण्यापासून तर गुरांच्या गंभीर आजारावर ईलाज करणारे ते धन्वंतरी होते. ते उत्तम प्रवचनकार होते. त्यांच्या लेखी अमोघ वक्तृत्व होते. कर्मकांडापेक्षा कर्तुत्वाला त्यांनी आपल्या वागणुकीतून महत्व दिले. त्यांच्या पायरीवर आजही कुणी खोटे बोलत नाही. ते उत्तम शेती तज्ञही होते. पेरणीपूर्वी बी -बियाणे अर्पण करण्याची येथे परंपरा आहे.

याशिवाय या गावांमध्ये दर दिवाळीला गोधन फत्तेपूर बाबांच्या टेकडीवर चढवणे, दर दोन वर्षांनी गावामध्ये साथ उत्सव साजरा करणे,असे वार्षिक वेळापत्रक हे जुळे गाव वर्षानुवर्ष पाळत आले आहे. बदलत्या काळामध्ये कुस्त्यांची दंगल, दरवर्षी होणारे वार्षिक कवी संमेलन अशा अनेक परंपरांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न गावातील तरुण करत आहेत.

या यात्रा महोत्सवाचा सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीयांचा सहभाग. एका मुस्लिम सिकंदर फकिराने फकीरजी महाराजांचा सुरुवातीला सांभाळ केला. त्यामुळे फकीराच्या घरचा फकीर झाला. पुढे फकीरचा फकीरजी व नंतर श्री. फकीरजी महाराज असा हा या महाराजांचा जीवन प्रवास आहे. त्यामुळे सर्वच धर्मपंथांमध्ये त्यांचे अनुयायी असून या यात्रेच्या निमित्ताने दोन्ही गावातील व या पंचक्रोशीतील नागरिक यात्रेमध्ये सहभागी होतात.

या मंदिराचे ट्रस्टी म्हणून विदर्भाचे ख्यातनाम कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग सध्या ही कार्यरत आहे.सर्वधर्म समुदायाच्या ट्रस्टींकडून येथील कार्यभार चालविला जातो.राज्य शासनाने देखील या परंपरेची व वैशिष्ट्याची दखल घेऊन या ठिकाणच्या मंदिराला ब दर्जा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक विकास कामेही झाली आहेत.या पंचक्रोशीमध्ये अतिशय माफक दरात या ठिकाणचे मंगल कार्यालय गोरगरीब जनतेला उपलब्ध केले जाते.

कधीकाळी या गावाच्या प्राचीनतेला दर्शविणारी भव्य दिव्य अशी गढी या गावाचे वैशिष्ट्य होते.या गावातील प्राचीन हेमाडपंथी मंदिर जमिनीत गाडलेले होते.या ठिकाणच्या दहा देवळांच्या भक्तांच्या समाधीचा समूह देखील श्रद्धेचा विषय आहे.या गावात कायम सांस्कृतिक, क्रीडा व कलाविषयक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे फकीरजी महाराजांच्या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वदूर जिल्ह्यातून भाविक येत असतात.या वर्षी ६ नोव्हेंबरला ही यात्रा होत आहे.

फकीरजी महाराज यात्रा महोत्सव

स्थळ : धनज माणिकवाडा

दिनांक : ६ नोव्हेंबर २०२५

काल्याचे किर्तन : दुपारी १२ ते २

महाप्रसादाची वेळ : दुपारी १२ ते ८

दहीहंडीची वेळ : सायंकाळी ६ नंतर

कवी संमेलनाची वेळ : रात्री ८ वाजता


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.