spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी खासदारांवर खोटे आरोप; देवा इलमे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

– जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेला महायुती सरकारच जबाबदार असल्याचा किसान काँग्रेसचा दावा

हंसराज भंडारा :- भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे वस्तुस्थितीपासून पळ काढण्याचा आणि स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

आज भंडारा शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख व ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेतील नियोजनशून्यता, निकृष्ट दर्जाची कामे आणि ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या कामांमुळे रस्त्यांचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णवाहिकांनाही दररोज सहन करावा लागत आहे.

देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीच्या ताब्यात आहेत. निधी मंजूर करण्यापासून ते कामांची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व यंत्रणा त्यांच्या नियंत्रणात असताना रस्त्यांच्या दुरवस्थेची जबाबदारी विरोधी पक्षाच्या खासदारावर ढकलणे हा जनतेच्या बुद्धीचा अपमान आहे.

निधी आम्ही आणला, विकास आम्ही केला, अशी श्रेय घेण्यासाठी नेहमी पुढे धावणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधी, कामे निकृष्ट झाली, रस्ते उध्वस्त झाले, नागरिक त्रस्त झाले की मात्र जबाबदारी टाळण्यासाठी विरोधी खासदाराचे नाव पुढे करतात. हा दुटप्पीपणा आता जनता ओळखून आहे.

भंडारा शहरातील बीएसएनएल कार्यालय ते खांब तलाव चौक हा राष्ट्रीय महामार्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग गेली दोन वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्येक दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची सातत्याने मागणी केली. एवढेच नव्हे तर लोकसभेच्या अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

याउलट भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचा तुमसर–बपेरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ मंजूर झाला असून त्या कामासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आणि पाठपुराव्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही वस्तुस्थिती लपवून दिशाभूल करणारे आरोप करणे म्हणजे जनतेशी प्रामाणिक न राहणे होय.

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी भंडारा–गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगारी, रस्ते, सिंचन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, वीज, वन्यप्राणी, धान उत्पादक शेतकरी आणि इतर अनेक ज्वलंत प्रश्न लोकसभेत सातत्याने मांडले आहेत. संसदेत आणि संसदेबाहेर जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे.

भंडारा जिल्ह्यात रोजगारनिर्मिती व्हावी, युवकांना स्थलांतर करावे लागू नये म्हणून साकोली तालुक्यातील भेल आणि मोहाडी तालुक्यातील रोहना येथील पॉवर प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या मागणीला बळ देण्याऐवजी मौन बाळगणे पसंत केले. जिल्ह्याच्या विकासापेक्षा राजकारण महत्त्वाचे मानणाऱ्यांनी आता विकासाच्या गप्पा मारणे थांबवावे.

आज प्रश्न एकाच खासदाराचा नाही, तर भंडारा जिल्ह्याच्या विकासाचा आहे. जनतेला चांगले रस्ते, रोजगार, उद्योग आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत; आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण नाही.

किसान काँग्रेसच्या वतीने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा देतो की, स्वतःच्या अपयशाचे खापर विरोधकांवर फोडण्याचे राजकारण तात्काळ बंद करावे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, निकृष्ट कामांची चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत.

अन्यथा भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन उभारेल आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेल.

Popular Articles