– दुष्काळातही फायनान्स कंपनीची मनमानी!
– अमरावतीत शिवसेना आक्रमक, तीन घरांच्या कुलूपांवर हातोडा
दर्यापुर :- फायनान्स कंपनीच्या मनमानीवर दर्यापुर आणि धामणगाव रेल्वेत शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत हातोडा कारवाई केली आहे. फायनान्स कंपनीने कर्ज थकले म्हणून सील केलेल्या तीन घराचे कुलूप शिवसेनेने तोडले आहे. दरम्यान, दिवाळीपूर्वी घर मिळाल्याने पीडित कुटुंबाच्या चेहेऱ्यावर हसू फुलले आहे. मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फायनान्स कंपनीच्या मनमानीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जाचे हप्ते थकले म्हणून कुटुंबाला घराबाहेर काढून घराला सील ठोकणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात दर्यापुर शहरातील आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे येथील फायनान्स कंपनीने शेतकरी कुटुंबाचे घर सील केले होते. दुष्काळी परिस्थिती असताना आणि घरात गरोदर महिला असताना सुद्धा घरातून बेघर केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकारची दखल घेत संतप्त झालेल्या शिवसेना नेते गोपाल अरबट पाटील आणि धामणगाव रेल्वेत जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात सील केलेल्या घराचे कुलूप तोडलं, आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात आला.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने आणि हाताला काम नसल्याने त्यांचे हप्ते थकले. याचा फायदा घेत फायनान्स कंपनीने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्या कुटुंबाला जबरदस्तीने घराबाहेर काढले आणि घराला कुलूप लावून सील केले. या कृत्यामुळे ते संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले. विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती पाहता कर्ज वसुलीला स्थगिती देणारा जी.आर. काढला असतानाही कंपनीने ही मुजोरी केली.








