सात महिन्यांत ५९८ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले; यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १९६ आत्महत्या
अमरावती २२ : पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ५९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सततच्या पीक नुकसानी, हमीभावाचा अभाव, वाढते कर्ज आणि शोषणामुळे तणावाखाली आलेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूचा मार्ग पत्करल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. या काळात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांतही आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या शेतकऱ्यांपैकी बहुतांश लहान व सीमांत शेतकरी होते, जे बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते.
शेती संकटात, हवामान आणि व्यवस्थेचा फटका
विदर्भातील प्रमुख पिकांमध्ये कापूस आणि सोयाबीन यांचा समावेश होतो. मात्र, वेळेवर पाऊस न पडणे, कीटकांचा प्रादुर्भाव आणि पीक विम्याच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाच्या मदतीच्या घोषणा केवळ कागदावरच राहत असून, प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
शेती सोडून आता कुटुंबांवर संकट
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक कुटुंबांकडे रोजच्या गरजांसाठीही पैसे नाहीत. अशा कुटुंबांना ना योग्य सरकारी मदत मिळते, ना सामाजिक आधार.
तत्काळ पावले उचलण्याची गरज
शेतकरी संघटनांनी शासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी बाधित कुटुंबांसाठी विशेष मदत पॅकेज, ठोस कर्जमाफी योजना, सिंचनासाठी गुंतवणूक, तसेच पारदर्शक पीक विमा योजना लागू करण्याची मागणी केली आहे. जर वेळीच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर हे संकट पुढील काळात अधिक भयावह रूप धारण करू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
@Filephoto




