हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात धानाचे भाव प्रति क्विंटल १,५०० ते २,००० रुपयांनी कोसळल्याने धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी बाजार समितीने तातडीने ‘धान तारण कर्ज योजना’ सुरू करावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भंडारा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
वाघमारे यांनी स्पष्ट केले की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठवलेल्या धानाच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत अल्प व्याजाने तारण कर्ज मिळते. यामुळे शेतकऱ्यांची तातडीची पैशांची गरज भागेल आणि पुढील काळात बाजारभाव सुधारल्यावर धान विकून ते कर्जाची परतफेड करू शकतील. तुमसर बाजार समितीकडे पुरेशी गोदामे उपलब्ध असतानाही ही शेतकरी हिताची योजना सुरू करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच दाक्षिणात्य व्यापारी अचानक का निघून गेले आणि दरात एवढी मोठी घसरण का झाली, याचे सत्य बाजार समितीने शेतकऱ्यांसमोर आणावे. बाजार समिती व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी नसून शेतकऱ्यांसाठी आहे; त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात तत्काळ हस्तक्षेप करून ही योजना तात्काळ लागू करावी, असा इशाराही त्यांनी दिला.








