spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७० वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला; कारवाईसाठी पीडित कुटुंबाची पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही कारवाई नाही; अडयाळ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हंसराज,भंडारा :- पवनी तालुक्यातील पो.स्टे. अड्याल अंतर्गत येणाऱ्या भावड येथे घराच्या बांधकामाच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धासह त्यांच्या कुटुंबावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झाल्याच्या प्रकरणात आज पीडित कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन देऊनही संशयितांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी भावड येथे घराच्या बांधकामाच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. तक्रारीनुसार, सुनीता माधव नागपूरकर, विनोद माधव नागपूरकर, मनोज माधव नागपूरकर, प्रियंका माधव नागपूरकर,  विनायक मनसाराम माहुरे, मयूर विनायक माहुरे आणि वेदांत विनायक माहुरे यांनी पूर्वनियोजित कट रचून कुऱ्हाड, लाकडी दांडा आणि विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात ७० वर्षीय पांडुरंग आत्माराम नागपूरकर आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, या गंभीर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना आधीच निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून उपलब्ध असतानाही अडयाळ पोलिसांनी संशयितांवर अद्याप कठोर कारवाई केलेली नाही. उलट, संशयित आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडितांविरुद्धच खोटी तक्रार दाखल केली असून, पोलीस मूळ तक्रारदार कुटुंबावरच मानसिक दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यातील संशयित अद्याप मोकाट फिरत  असल्याने पीडित कुटुंब सध्या दहशतीखाली आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. “न्याय मिळण्यात विलंब म्हणजे न्याय  नाकारल्यासारखे आहे,” अशी भावना व्यक्त करत प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती पीडित कुटुंबाने केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेला देविका किशोर नागपूरकर , किशोर तुकाराम नागपूरकर , पांडुरंग आत्माराम नागपूरकर , लीलाधर विलास नागपूरकर , भारत बाळकृष्ण नागपूरकर ,ईश्वर तुकाराम नागपूरकर ,तेजराम नथुजी नागरीकर , विजय पुंडलिकराव नागपूरकर , स्नेहा पांडुरंग नागपूरकर यांची उपस्थिती होती.

Popular Articles