spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यातून पंढरपूरसाठी साडेसातशे किलोमीटरची सायकल वारी रवाना बायसिकल असोसिएशनचे

हंसराज,भंडारा :- बायसिकल असोसिएशन भंडाराच्या सात सायकलपटूंनी विठ्ठल दर्शनासाठी भंडारा ते पंढरपूर अशी साडेसातशे किलोमीटरची सायकल वारी सुरू केली आहे. ४ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत ही वारी पार पडणार असून यामध्ये सेवानिवृत्त पोलीस राजकुमार बावनकर, दादासाहेब ठाकरे, प्रमोद नेवारे, प्रवीण कारेमोरे, सुधीर गायधने, अमोल वाडीभस्मे आणि अमोल मानापुरे या सायकलपटूंचा समावेश आहे.

या वारीचा प्रारंभ ४ जुलै रोजी सकाळी शहरातील बहिरंगेश्वर मंदिर येथून झाला. यावेळी भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मधुरा मधुकर, सभापती वृषाली ब्राह्मणकर, रुपाली निवारे, जयश्री बोरकर, संजय एकापुरे, नितीन गायधने, लोकेश खोब्रागडे यांच्यासह योग विद्या धामचे योगसाधक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सायकलपटूंना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले.

पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी सायकल वारकऱ्यांनी भंडारा शहरातून प्रदक्षिणा घातली. बहिरंगेश्वर मंदिरातून निघालेली ही वारी शास्त्री चौक येथे पोहोचली, जिथे सतीश तुरकर यांनी वारीचे स्वागत केले. त्यानंतर वारी विठ्ठल रुक्माई मंदिरात पोहोचली. शहरात भ्रमण करत असताना गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक आणि राजीव गांधी चौक येथे वारकऱ्यांनी सायकलसह पारंपरिक ‘रिंगण’ घातले. राजीव गांधी चौकात आशु गोंडाने आणि मंगेश वंजारी यांनी वारीचे स्वागत केले. शहरात विविध ठिकाणी रिंगण पूर्ण केल्यानंतर वारी पुन्हा बहिरंगेश्वर मंदिरात आली आणि तिथून पंढरपूरच्या मार्गाला लागली.

बायसिकल असोसिएशन भंडाराचे अध्यक्ष पंकज हरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सायकलपटू दररोज प्रवास करून साडेसातशे किलोमीटरचे अंतर सहा दिवसांत पूर्ण करतील. सायकलपटूंच्या प्रवासादरम्यान त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. विठ्ठलाचे दर्शन घेऊन हे सर्व सायकल वारकरी १४ जुलैच्या सकाळी पुन्हा भंडाऱ्यात परतणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.