– आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निधीवाटपावर प्रश्नचिन्ह; खासदार निधी ३० कोटी करण्याची मागणी
संदीप कांबळे,कामठी :- विकासकामांसाठी उपलब्ध होणाऱ्या स्थानिक विकास निधीच्या तुलनेत विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या भौगोलिक विस्ताराचे गणित पाहिले तर निधीच्या प्रमाणाबाबत वेगळेच चित्र समोर येते. एका विधानसभा मतदारसंघासाठी आमदारांना उपलब्ध होणारा निधी आणि अनेक विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघासाठी खासदारांना उपलब्ध होणारा निधी यांची तुलना केल्यास “आमदारासाठी क्षेत्र लहान आणि निधी मोठा, तर खासदाराला क्षेत्र मोठे आणि निधी छोटा; ही विकासाची गणिते कशी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघात कामठी तहसील, मौदा तहसीलचा काही भाग तसेच नागपूर ग्रामीणचा काही भाग समाविष्ट आहे. या विधानसभा क्षेत्राच्या स्थानिक विकासासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना उपलब्ध होणाऱ्या वार्षिक निधीच्या तुलनेत रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार श्यामकुमार बर्वे यांना उपलब्ध असलेल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीची मर्यादा मोठ्या क्षेत्रासाठी विभागली जाते.
रामटेक लोकसभा मतदारसंघात कामठी, रामटेक, काटोल, सावनेर, हिंगणा आणि उमरेड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे या विस्तीर्ण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच शेतकरी व युवकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या गरजा मोठ्या आहेत.
खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सध्या प्रत्येक खासदारासाठी वार्षिक ५ कोटी रुपयांची निधी मर्यादा आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी ५ कोटी रुपये उपलब्ध होत असतील, तर प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्रमाण अत्यल्प ठरते.
या तुलनेत सहा विधानसभा मतदारसंघांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास प्रत्येकी ५ कोटी रुपये या प्रमाणात एकत्रित रक्कम ३० कोटी रुपये होते. मात्र, संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खासदार स्तरावर ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. त्यामुळे लोकसभा क्षेत्राचा विस्तार आणि विकासाच्या गरजा अधिक असताना निधीची मर्यादा मात्र तुलनेने कमी असल्याने विकासकामांचा आवाका मर्यादित राहण्याचा प्रश्न निर्माण होतो.
याच पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीची वार्षिक मर्यादा ३० कोटी रुपये करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. वाढीव निधी उपलब्ध झाल्यास मतदारसंघातील विविध भागांच्या गरजेनुसार अधिक व्यापक स्वरूपाची विकासकामे हाती घेता येऊ शकतील.
रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्राचा, सहा विधानसभा मतदारसंघांचा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या गरजांचा विचार करून खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केंद्र सरकारकडे खासदार निधी वाढविण्याची मागणी प्रभावीपणे मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“रामटेक लोकसभा मतदारसंघातील विकासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी ३० कोटी रुपये करणे आवश्यक आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा क्षेत्रासाठी सध्याचा निधी अपुरा ठरत असल्याने खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केंद्र सरकारकडे निधीवाढीसाठी ठोस पाठपुरावा करावा,” अशी मागणी करण्यात येत आहे.








