spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक; ७ लाखांच्या मुद्देमालासह तीन आरोपी अटकेत

हंसराज,भंडारा तुमसर :- भंडारा जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, तुमसर पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान विविध ठिकाणी धाडी टाकून ७ लाख १२ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध रेती वाहतूक, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री आणि गावठी दारू गाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पाऊले उचलण्यात आली आहेत. ४ जुलै रोजी शहरात आणि ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या कारवाईचा पहिला टप्पा अवैध रेती उपशाविरुद्ध होता. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चक्रधर कैलास परसमोडे (वय २० वर्ष, रा. बोरी, ता. तुमसर) याला एका विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या निळ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टरसह (क्रमांक MH36AR5847) आणि ट्रॉलीसह (क्रमांक MH36AL9706) रंगेहात पकडले. या ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरलेली होती. पोलिसांनी या कारवाईत ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेती तस्करांविरुद्धच्या या कारवाईने गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी तामसवाडी येथील आशिष केशवराव डबले (वय ३५ वर्ष) याच्या घरावर छापा टाकला. या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. यामध्ये रिम झिम टीम टोबॅको, आर गोल्ड जी-२० फ्लेवर टोबॅको, इगल हुक्का शिशा आणि सुप्रीम पान पराग अशा ४ हजार ९८५ रुपये किमतीच्या मालाचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) विभागाला माहिती दिली असून, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याच मोहिमेत तिसरी कारवाई नेहरु वॉर्डात करण्यात आली, जिथे ६५ वर्षीय गिता सुरेश गुर्वे हिला १० लिटर मोहफुलाच्या गावठी दारूसह अटक करण्यात आली. तिच्याकडून २ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या कारवाईत तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस उपनिरीक्षक प्रितम येवले, मनोहर शहारे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस कर्मचारी रामटेके, ईडपाते, बळदे, गिरीपुंजे, झंझाड, बावने, दमाहे, कांबळे, शेंडे आणि महिला पोलीस शिपाई कडव यांनी विशेष कामगिरी बजावली. शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढेही अशीच कडक मोहीम राबवली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Popular Articles