कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पाच गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने केलेली वाहतूक उघडकीस आणली. या प्रकरणी एक आरोपीला अटक करण्यात आली असून जनावरांचा मालक फरार आहे. घटनेबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 07 डिसेंबर रोजी सकाळी सुमारास 8 वाजताच्या दरम्यान पीटर वाहनाने गस्तीवर असलेल्या जुनी कामठी पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राम मंदिरजवळील मच्छीपूल परिसरातून गोवंश जनावरे बेकायदेशीररीत्या कतलीसाठी टाटा योद्धा वाहनातून नेली जात आहेत.
माहिती विश्वसनीय असल्याने त्वरित कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एमएच 30 बीडी 3820 क्रमांकाच्या टाटा योद्धा वाहनाला अडवून तपासणी केली असता, पाच गोवंश जनावरे नायलॉन दोरीने निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून जनावरे सुरक्षित ताब्यात घेण्यात आली.
पोलीसांनी फिर्यादी पोशि प्रमोद शेळके यांच्या तक्रारीवरून कलम 11 (1) (ड) प्रतिबंधक अधिनियम 1960 सुधारणा 2015 कलम 66, 83/177 मोटार वाहन कायदा अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी कुणाल सुनील दुर्गुळे (वय 24 वर्षे), रा. आसोळी, ता. रामटेक, जि. नागपूर याला अटक करण्यात आली असून टाटा योद्धा वाहन (किंमत अंदाजे 5,00,000 रु.) जप्त करण्यात आले आहे. जनावरांची किंमत 75,000 रु. असून असा एकूण 5,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जनावरांचा मालक फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.आरोपीची चौकशी केली असता, वाहनातील गोवंश जनावरे चौधरी मशिद, कामठी येथे राहणाऱ्या कदीर कुरेशी (वय अंदाजे 40 वर्षे) यांची असल्याचे त्याने सांगितले. सदर मालमत्ता मालक कदीर कुरेशी हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पीएसआय मिलिंद मेश्राम, पोलीस शिपाई विवेक दोरसेटवार, प्रमोद शेळके, योगेश पिपरोदे आदींनी केली.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




