spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ७७ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

– पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर पालकमंत्री संजय राठोड  

यवतमाळ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन आज स्थानिक समता मैदान येथे साजरा करण्यात आला. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी सिंचन, कृषी, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. किशोर मानकर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले आणि पोलीस दलाने मानवंदना दिली. याप्रसंगी उपस्थित सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांना ‘बालविवाह प्रतिबंधक शपथ’ देण्यात आली. सामाजिक कुप्रथा दूर करून सुदृढ समाज घडवण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या स्मृतींना उजाळा देत, कार्यक्रमात वीरमाता व वीरपत्नींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, आदर्श कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात घरांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी लाभार्थ्यांचा भव्य गृहप्रवेश सोहळा साजरा करण्यासाठी ‘येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी आपल्या घरी’ या विशेष फलकाचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. २६ जानेवारी ते १ मे या कालावधीत १ लाख घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेतून व जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या पुढाकारातून एकूण ६२ वाहने मंजूर झाली आहेत. त्यापैकी प्राप्त झालेल्या २४ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून केले.

पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, “यवतमाळ जिल्हा आज तंत्रज्ञान, कृषी आणि सिंचन क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. बेंबळा प्रकल्प आणि निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे जिल्ह्याचे नंदनवन होईल. १.९५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवून आपण महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श ठेवला आहे.” तसेच ‘मिशन उभारी’ आणि ‘योजना पोर्टल’च्या यशाबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

Popular Articles