नागपूर :– शहरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल प्रकल्पातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ९९८ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा उड्डाणपूल थेट एका घराच्या बाल्कनीलगत जात असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
अशोक चौक परिसरातील या घराची बाल्कनी पुलाच्या बाहेरील कडेला जोडलेली दिसत असून, स्थानिक रहिवाशांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घराचे मालक पत्रे कुटुंब असून, नागपूर महानगरपालिकेने (NMC) काही महिन्यांपूर्वी नोटीस दिल्याचे समजते, मात्र पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही.
या घटनेनंतर सोशल मीडियावर उड्डाणपुलाच्या डिझाइन व नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नेटिझन्सनी या पुलाला ‘फ्लायओव्हर-टच हाऊस’ असे नाव दिले असून, हा प्रकार शहर नियोजनातील मोठी चूक असल्याची टीका होत आहे.
उड्डाणपूल तयार करण्यामागे कमल चौक, रेशीमबाग चौक आणि दिघोरी येथील वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, थेट घराच्या बाल्कनीलगत पुलाचा भाग जाण्यामुळे सुरक्षेचा प्रश्न, खासगी मालमत्तेवरील अतिक्रमण, तसेच नियोजनातील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, भोपाळमधील ९० अंशाच्या पुलानंतर नागपूरमधील हा प्रकार शहर नियोजनाच्या निष्काळजीपणाचे उत्तम उदाहरण ठरतोय. “सुरक्षा आणि खासगी मालमत्तेकडे असे दुर्लक्ष कसे होऊ शकते?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.



