Ø नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना
यवतमाळ :- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची घोषणा करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त (औषधे) यवतमाळ डॉ. अ. माणिकराव यांनी याबाबत माहिती दिली.
सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन, यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत असून. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत.
तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी व निमसरकारी रुग्णालये यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक तालुका व गाव पातळीवर आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात आले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन केले आहे. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०१५०६८७ वर संपर्क साधावा किंवा fda.ytl@gmail.com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) यवतमाळ यांनी केले आहे.