spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विदर्भाला प्रथमच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्षपद

– संदीप जोशी यांची निवड; क्रीडा क्षेत्रातील योगदानाची पावती

नागपूर :- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने विदर्भाला प्रथमच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक आज (ता. ८) मुंबई येथे पार पडली. या बैठकीत वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी संदीप जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. कार्यकारिणीने त्यास मान्यता देत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. जोशी हे यापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद यापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर आता संदीप जोशी यांची निवड झाली आहे.

संदीप जोशी हे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष असून राज्यातील हॉकी संघटना, कुस्ती संघटना तसेच विविध क्रीडा संघटनांशी ते सक्रियपणे जुळलेले आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन, क्रीडा सुविधांचा विकास तसेच विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सन्मानाचे नव्हे तर जबाबदारीचे पद : जोशी

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना संदीप जोशी म्हणाले, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. हे पद माझ्यासाठी केवळ सन्मानाचे नसून मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि ऑलिम्पिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. विदर्भाला मिळालेला हा मान अधिक मोठ्या क्रीडा यशात रूपांतरित करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू, असे म्हणत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचे आभार मानले.

Popular Articles