– बंधाऱ्यामुळे 60 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
नागपूर :- वनराई बंधाऱ्याचा नागपूर पॅटर्न हा राज्यात ओळखला जातो. महाराष्ट्र समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून काटोल तालुक्यातील खापरी बारोकर या गावात केवळ तीन तासात ग्रामस्थांचा श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या वनराई बंधाऱ्यात 10 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी साठविण्यात आले आहे. या बंधाराऱ्यासाठी सहाशे रिकाम्या आणि खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर केला आहे.
संत्रा या फळपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या काटोल तालुक्यातील भु-गर्भातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असल्यामुळे वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. पीण्याच्या पाण्यासह शाश्वत सिंचनासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात दोन वनराई बंधारे श्रमदानातुन बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे ग्रामीण भागातील नाले, ओढे तसेच नद्यांना पाणी उपलब्ध आहे. परंतू गावाचा शिवारातून वाहून जाणारे पाणी केवळ वनराई बंधाऱ्यामुळेच अडविणे सुलभ आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकाराचे बंधारे उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळेच सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांच्या वापर करून पाणी अडविण्याचा प्रयोग विविध गावात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाबाबत प्राधान्य दिल्यामुळे राज्याचा विविध भागात पाणी अडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला सुरवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला वनराई बंधारा हा उपक्रम पुढे नागपूर पॅटर्न ठरला आहे. 

काटोल तालुक्यातील खापरी बोरकर या गावातील नागरिकांनी श्रमदान करून गावातील नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. त्यांना गटविकास अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचा सहभागामुळे सुमारे 10 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी साठवणुक होईल अशा बंधारा तयार करण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे 30 फुट बाय 5 फुट खोल व 250 फुट लांब क्षेत्रात पाण्याची साठवणूक झाली आहे. या बंधाऱ्यासाठी स्थानिक संसाधणाचा वापर व सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करण्यात आला आहे. सरपंच, ग्रामस्थ तसेच गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्यासह 70 नागरिकांनी श्रमदान करून केवळ 3 तासात या बंधाऱ्याची निर्मिती केली. या बंधाऱ्यासाठी सिमेंट तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडे असलेल्या खतांच्या 600 रिकाम्या पिशव्यांचा वापर केला आहे.
वनराई बंधाऱ्यामुळे पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य झाले असून गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहरीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासोबतच या परिसरात असलेल्या शेतातील सिंचनाचा विहरींना तसेच शेतीसाठी पुढील तीन महिने संरक्षित सिंचनाचा लाभ होणार आहे. काटोल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये 30 नोव्होंबर पर्यंत वनराई बंधाऱ्याची मोहिम राबविण्याचा संकल्प गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला.
खापरी बोरगाव येथे श्रमदानातून बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यासाठी खापरी बोरकर या गावच्या सरपंच्या सुजाता बाळोकर, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, कृषी अधिकारी अनिल आडेवार, उपअभियंता गणेश गिरमकर, विस्तार अधिकारी उत्तम झेलगोंदे, सुरेश निहारे, संजय भक्ते, संजय जुनघरे आदी कर्मचारी व ग्रामस्थांनी वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.
वनराई बंधाऱ्यामुळे गावात पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण होवू शकतो या संकल्पनेमुळेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वाढत आहे. त्यामुळेच पुढील 10 दिवसात एक मोहिम म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे रब्बी पिकांसाठी संरक्षित सिंचन तसेच पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे बळकटीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. वनराई बंधारा जलसंधारणाचा एक प्रभावी मार्ग असून अतिशय कमी खर्चात आणि स्थानिक संसाधणाचा वापर करून पाणी अडविणे सहज आणि सुलभ झाले आहे. स्थानिक भुजल विकास रचना लक्षात घेता वनराई बंधाऱ्याची संकल्पना अधिक उपयोगी ठरणारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधण्याला प्राधान्य दिले आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांची या उपक्रमाला श्रमदानाची जोड मिळत आहे.




