“कचारगड यात्रेतील निशुल्क भोजन सेवा ही सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण” – ज़ि प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
84

यासीन शेख, गोंदीया :- गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक व यात्रेकरू दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या सेवेसाठी जनजाती चेतना समिती, गोंदिया (कचारगड) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारी निशुल्क भोजन सेवा ही अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

कचारगड यात्रेच्या काळात जनजाती चेतना समितीच्या वतीने दूरदूरहून आलेल्या भाविकांसाठी दररोज नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छ, पौष्टिक व वेळेत भोजनाचे वितरण करण्यात येते. या भोजन वितरण कार्यक्रमास भेट देऊन अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. “यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात भाविकांना अन्न, पाणी व सुविधा पुरविणे ही केवळ सेवा नसून समाजाप्रतीची जबाबदारी आहे. जनजाती चेतना समिती ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे,” असे ते आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, जनजाती चेतना समितीचे अध्यक्ष तसेच पंचायत समिती सदस्य डॉ. नाजूक कुंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जनजाती चेतना समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत होते.

अध्यक्ष भेंडारकर यांनी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे भाविकांची सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कचारगड यात्रेत राबविण्यात येणारी ही निशुल्क भोजन व्यवस्था भाविकांसाठी मोठा आधार ठरत असून, सामाजिक एकोपा व सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.