spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नक्षलवादाच्या छायेतून ज्ञानप्रकाशाकडे: गडचिरोलीत ७२ वाचनालयांची उभारणी”  

– “गावकऱ्यांच्या सहकार्यातून पोलिसांचा अनोखा उपक्रम: २०५ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत भरती”  

गडचिरोली :- एकेकाळी नक्षलवाद्यांच्या धाकात जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आज वेगळेच चित्र दिसत आहे. ज्या भागात पोलिसांचा मागमूसही नव्हता, त्या अतिदुर्गम गावांमध्ये आज पोलिस ठाण्यांसोबतच ज्ञानाचे दीपही पेटले आहेत. जिल्हा पोलिसांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत तब्बल ७२ वाचनालये उभारली आहेत.

या उपक्रमातून आजवर सुमारे २०५ विद्यार्थ्यांनी पोलिस शिपाई, तलाठी, वनरक्षक आदी पदांवर निवड मिळवली आहे. गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाचनालयांमधून जवळपास २४ हजार पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून ८ हजारांहून अधिक मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून नैतिक मूल्ये व संस्कार यांचेही धडे घेत आहेत.

१८ जानेवारी २०२३ रोजी कोटगुल येथे पहिले सार्वजनिक वाचनालय सुरू झाले आणि तिथूनच या चळवळीची सुरुवात झाली. त्यानंतर नारगुंडा येथे जिल्ह्यातील पहिले वाय-फाय सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले.

या परिवर्तनामध्ये गावकरी, सीआरपीएफ, एसआरपीएफ, लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच राज्यातील इतर भागात बदली झालेले गडचिरोलीचे माजी अधिकारी यांचेही मोठे योगदान आहे. त्यांनी विविध संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून पुस्तके पाठवून ही वाचनालये समृद्ध केली. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसोबतच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचाही यात समावेश आहे.

यामुळे नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या या जिल्ह्यात आता ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा नवा चेहरा घडत आहे.

फाईल फोटो


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.