स्नेहनगरवासीय त्रस्त; सामाजिक कार्यकर्त्यांचा मारबत मोर्चाचा इशारा
गडचिरोली २५ : शहरातील स्नेहनगर परिसरातील नागरिक सध्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. येथील नळाद्वारे दूषित आणि विषारी पाण्याचा पुरवठा होत असून, यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनेकदा नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या असूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे.
नागरिकांचा संताप व्यक्त करताना रहिवाशांनी सवाल केला की, “हेच दूषित पाणी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना पाजायचे का?” आम्ही नियमितपणे पाणीपट्टी कर भरतो, मग त्रास का सहन करायचा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्नेहनगरसह शहरातील विविध भागात नाल्यांचा उपसा न होणे, कचरा उचलला न जाणे, वार्डांमध्ये झाडू न लागणे, फवारणी न होणे या समस्या महिन्यांपासून प्रलंबित आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असताना नगरपरिषद प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र समोर आले आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी इशारा दिला आहे की, “झोपलेल्या नगरपरिषदेला जागं करण्यासाठी लवकरच मारबत मोर्चा काढण्यात येईल.”
स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाणीपुरवठा स्वच्छ करण्याची, नालेसफाई, फवारणी व आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. गडचिरोली नगरपरिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार आता उघड झाला असून, यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.




