गडचिरोली १४ : शासनाने अनेक वर्षांपूर्वीच रेशन पोर्टेबिलिटी योजना लागू करण्याचे आदेश दिले असतानाही गडचिरोली जिल्ह्यात ती योजना अद्याप राबवली गेलेली नाही. कोणत्याही रास्तभाव दुकानातून धान्य घेता यावे, यासाठी पोर्टेबिलिटी योजना आहे. मात्र, जिल्ह्यात कुठल्याही दुकानात हा लाभ मिळत नसल्याने गरीब जनता अडचणीत सापडली आहे.
नागरिकांच्या मते, हा सर्व भोंगळ कारभार जिल्हा पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे सुरू आहे. शासन आदेश पाळण्याऐवजी विभागाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. नक्षलसमर्पित नागरिकांना मिळणाऱ्या अंत्योदय योजनेप्रमाणेच, गोरगरीब विधवा महिला, अपंग, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्ण, सिकलसेल बाधित, तलाकग्रस्त महिला यांनाही तातडीने अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच, गडचिरोली तहसील पुरवठा विभागातील कायमस्वरूपी कार्ड लिपिक व परमिट लिपिक पदे तातडीने भरण्याची गरज आहे. अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तींच्या नावावर असलेले रास्तभाव दुकानांचे परवाने रद्द करून ते महिला बचत गटांना देण्याची मागणी होत आहे.
ऑनलाइन रेशन कार्ड प्रक्रियेत गरीब जनतेला वेटीस धरू नये, जुन्या पद्धतीने कार्ड देण्यात यावेत आणि ऑनलाइन कामे तहसील पुरवठा कार्यालयामार्फतच पार पाडावीत, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, येत्या महिनाभरात या सर्व प्रश्नांवर तोडगा न काढल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
@filephoto




