– जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आवाहन; गॅस एजन्सी धारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि अफवा पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील नागरिकांना नियमित आणि वेळेत गॅस सिलेंडर मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जिल्ह्यातील २४ गॅस एजन्सी धारकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्यासह पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणत्याही गॅस एजन्सीने नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करू नये किंवा अतिरिक्त शुल्क आकारू नये. नियमानुसार गॅस उपलब्ध करून देणे ही एजन्सीची जबाबदारी असून, तक्रार प्राप्त झाल्यास कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
बैठकीत एजन्सी धारकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच, भीतीपोटी नागरिकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग केल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच तिन्ही कंपन्यांच्या (HPCL, IOCL, BPCL) सेल्स ऑफिसर्सची बैठक बोलावली असल्याचे सांगितले.
केवळ बैठकीवर न थांबता, जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज सकाळी स्वतः भंडारा शहरातील एका गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन वितरणाच्या स्थितीची पाहणी केली. ग्राहकांशी संवाद साधून त्यांनी प्रशासनातर्फे सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्त केले.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज: मदतीसाठी ‘हेल्पलाईन’
गॅस पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी विशेष ‘संपर्क अधिकारी’ नियुक्त केले आहेत. नागरिकांना गॅस सिलेंडर मिळण्याबाबत काहीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या ०७१८४-२५००४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.