spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

7 जणांसोबत मिळून प्रेयसीनंच केलं प्रियकराचं अपहरण

पुणे :- अनेकदा चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात मुलींचे अपहरण करून त्यांच्याशी बळजबरीने लग्न करण्याचे प्रकार आपण ऐकतो किंवा पाहतो. पण पुण्यात याच्या अगदी उलट आणि अत्यंत थरारक असा प्रकार उघडकीस आला आहे. यात एका २७ वर्षीय तरुणीने चक्क आपल्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे लग्नासाठी भररस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण केले. हा भयंकर प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी थेट बीड जिल्हा गाठून या ‘लेडी डॉन’सह तिच्या ७ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

तपासानंतर या अपहरणामागचे जे कारण समोर आले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. चौकशीदरम्यान उघड झाले की, आरोपी तरुणी आणि नीलेश यांची आधीपासून मैत्री होती. तिची नीलेशसोबत लग्न करण्याची तीव्र इच्छा होती, मात्र नीलेश या लग्नासाठी अजिबात तयार होत नव्हता. अखेर तो ऐकत नाही हे पाहून या ‘माथेफिरू’ तरुणीने आपल्या ७ साथीदारांना गोळा केले आणि नीलेशचे अपहरण करून त्याच्याशी बळजबरीने लग्न करण्याचा महाभयंकर कट रचला हा सर्व प्रकार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडला. फिर्यादी अजय लक्ष्मण बोद्रे (रा. शिंदेवाडी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. २७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अजय यांचा भाऊ नीलेश बोद्रे याला काही जणांनी रस्त्यात अडवले. त्याला बेदम मारहाण करत एका भाड्याच्या टुरिस्ट मोटारीत बळजबरीने कोंडले आणि तिथून सुसाट वेगाने पसार झाले.

पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेसह लोणीकंद पोलिसांची ५ पथके तातडीने रवाना करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्या टुरिस्ट गाडीचा क्रमांक मिळवला. ती गाडी येवलेवाडीतील एका व्यक्तीची होती. येवलेवाडीचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी गाडीच्या चालकाचा मोबाईल नंबर मिळवला आणि आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोहोचले असता, पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे धाड टाकून नीलेश बोद्रे याची सुखरूप सुटका केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.